ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा चॅप्टर १’ समोर सर्व चित्रपट अपयशी ठरले आहेत. अनेक सिनेमांच्या गर्दीत कांतारा चॅप्टर १ ने प्रेक्षकांच्या मनावर चांगलेच गारूड केल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. ऋषभ शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटानं गेल्या आठ दिवसांत दररोज धमाकेदार कमाई केली आहे. 2022 च्या ब्लॉकबस्टर ‘कांतारा’चा सिक्वेल बनवण्यासाठी ऋषभ शेट्टीनं तीन वर्षे घालवली. 2022 नंतर दुसरा भाग 2 ऑक्टोबर 2025 रोजी प्रदर्शित झाला. लोकांना या चित्रपटातून खरोखर काहीतरी खास मिळेल अशी अपेक्षा होती आणि ती प्रत्यक्षात आली.
‘कांतारा चॅप्टर १ ‘ची सर्वत्र हवा, जोरदार कमाई
‘कांतारा’चं कलेक्शन सातत्यानं वाढतंय. आतापर्यंत चित्रपटांच्या कलेक्शनवर एक नजर टाकली. तसेच, आठव्या दिवशी चित्रपटानं कितीचा गल्ला केला? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

| दिवस | बॉक्स ऑफिस कलेक्शन (कोट्यवधींमध्ये) |
| दिवस 1 | 61.85 कोटी |
| दिवस 2 | 45.4 कोटी |
| दिवस 3 | 55 कोटी |
| दिवस 4 | 63 कोटी |
| दिवस 5 | 31.5 कोटी |
| दिवस 6 | 34.25 कोटी |
| दिवस 7 | 25.25 कोटी |
| दिवस 8 | 20.50 कोटी |
| एकूण | 334.94 कोटी |
कांताराची स्टोरी खरी की खोटी?
या चित्रपटातील कथा किती खरी आहे आणि किती कल्पना आहे, या प्रश्नावर रिषभ शेट्टीने उत्तर दिले. तो म्हणाला, “यातील कथा सत्य आणि कल्पनेचे मिश्रण आहे. आम्ही एक मायालोक दाखवला आहे. इतिहास आणि देवांच्या कथांना एकत्र गुंफून हा चित्रपट तयार केला आहे.” ‘कांतारा चॅप्टर १’ ने अवघ्या पाच दिवसांत जगभरात ३०० कोटींचा टप्पा पार करत पुन्हा एकदा ‘ब्लॉकबस्टर’ चित्रपट असल्याचे सिद्ध केले आहे. भारतातही या चित्रपटाने २५५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ऋषभ शेट्टीनेच या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट २०२२ मध्ये आलेल्या ‘कांतारा’ चित्रपटाचा प्रीक्वल आहे.
कांतारा चॅप्टर १ चे कथानक नेमके काय?
कांतारा चॅप्टर १ हा मूळ ‘कांतारा २०२२’ चित्रपटाचा प्रीक्वेल आहे, म्हणजेच या भागात मूळ कथेला आधी काय घडले होते, त्याची पार्श्वभूमी दाखवली आहे. कथा प्राचीन काळातील कर्नाटकातील तटीय भागातल्या जंगलांनी वेढलेल्या गावात घडते. गावातील लोक निसर्ग आणि देव यांच्याशी घट्ट जोडलेले असून ते पण्जूरली देव आणि गुलीग देवता या जंगल देवतांची पूजा करतात. या देवतांच्या रक्षणाखाली गावकरी शांततेत जीवन जगत असतात. मात्र, एका लोभी राजाला त्या गावातील सुपीक जमीन हवी असते. सुरुवातीला तो ती जमीन गावकऱ्यांना दान देतो, पण नंतर लोभाने पछाडलेला राजा ती परत मिळवण्याचा प्रयत्न करतो.
या विश्वासघातामुळे देवतेचा कोप ओढवतो आणि त्यातूनच देव आणि माणूस यांच्यातील पवित्र कराराची सुरुवात होते. देव जमिनीचे आणि गावकऱ्यांचे रक्षण करेल, आणि लोक त्याची भक्तीपूर्वक सेवा करतील. या कथेत एक योद्धा उदयास येतो, जो देवतेच्या आशीर्वादाने गावाच्या रक्षणासाठी लढतो. त्याच्या माध्यमातून भूत कोला या पारंपरिक नृत्य-पूजेचा उगम आणि त्यामागील आध्यात्मिक अर्थ उलगडतो. कथानकात श्रद्धा, मानवी लोभ, सत्तेचा संघर्ष आणि निसर्गाशी माणसाचं नातं यांचा सुंदर संगम दिसतो. कांतारा चॅप्टर १ हे मूळ चित्रपटात दाखवलेल्या घटनांना गूढ, पौराणिक आणि भावनिक पार्श्वभूमी देतं आणि देव-मानव संबंधाचा गूढ तत्त्वज्ञानिक अर्थ स्पष्ट करतं.











