सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचे काल रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात दुःखद निधन झाले. वयाच्या केवळ ४८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने विधी, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात शोककळा पसरली असून अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यात अभिनेता रितेश देशमुखचा (Riteish Deshmukh) भावनिक संदेश विशेष लक्षवेधी ठरला आहे.
सिद्धार्थ, माझा भाऊ… रितेशची भावस्पर्शी श्रद्धांजली – Riteish Deshmukh
सिद्धार्थ शिंदे हे केवळ सुप्रीम कोर्टात केस लढणारे वकील नव्हते, तर अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे व्यक्तिमत्व होते, असे भावनिक शब्द रितेश देशमुखने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले. शिंदे हे रितेशचे शाळकरी जीवनातील वर्गमित्र होते. दोघांची मैत्री वर्षानुवर्षे घट्ट राहिली होती. रितेशच्या आगामी “राजा शिवाजी” या चित्रपटात सिद्धार्थ यांची छोटीशी पण महत्त्वपूर्ण भूमिका होती. “शिवरायांविषयी त्यांचं प्रेम इतकं खोल होतं की, केवळ एका दृश्यासाठीसुद्धा त्यांनी उत्साहाने होकार दिला होता,” असं रितेशने लिहिलं.

शूटिंगच्या आठवणी, आणि अचानक आलेली दुःखद बातमी
काही महिन्यांपूर्वी सिद्धार्थ शिंदे यांनी संजय दत्त आणि रितेशसोबत चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सहभाग घेतला होता. सेटवरील त्या क्षणांची आठवण करताना रितेश म्हणतो, “आज त्याचा सीन एडिट करताना त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून मला फोन करून तो आनंद त्याच्याशी वाटून घ्यावा असं वाटलं… पण त्याऐवजी मनाला सुन्न करणारी बातमी आली तो आता आपल्यात नाही. Riteish Deshmukh
सिद्धार्थ शिंदे – एक अभ्यासू, तत्त्वनिष्ठ विधिज्ञ
सिद्धार्थ शिंदे हे केवळ कायद्याचे तज्ञ नव्हते, तर महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींचे साक्षेपी विश्लेषकही होते. संविधानाचा खोल अभ्यास, आणि गुंतागुंतीच्या कायदेशीर बाबी सामान्यांना समजावून सांगण्याची हातोटी यामुळे त्यांना एक वेगळीच ओळख लाभली होती. ते माजी केंद्रीय कृषिमंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे नातू होते.
“सिद्धार्थ, माझा भाऊ, तू एक दुर्मिळ रत्न होतास. तुझी आठवण कायम हृदयात जपली जाईल,” अशा शब्दात रितेशने आपल्या मित्राला अखेरचा निरोप दिला. या श्रद्धांजलीतून फक्त एक कलाकार नाही, तर एका अत्यंत जिवलग मित्राचा शोक व्यक्त झाल्याचं प्रकर्षाने जाणवतं.











