Saali Mohabbat Trailer : साली मोहब्बतचा ट्रेलर प्रदर्शित; राधिका आपटे–दिव्येंदु शर्मा यांची थरारक कथा

Asavari Khedekar Burumbadkar

Saali Mohabbat Trailer : ‘साली मोहब्बत’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राधिका आपटे आणि दिव्येंदु शर्मा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या थ्रिलर ड्रामाची निर्मिती फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी केली आहे. मनोरंजन क्षेत्रात आपली खास ओळख निर्माण केल्यानंतर आता ते चित्रपट निर्मितीमध्येही सक्रिय झाले आहेत. त्यांच्या निर्मितीतील पहिली फिल्म ‘गुस्ताख इश्क’ लवकरच चित्रपटगृहांमध्ये येणार असून, त्यानंतर त्यांच्या दुसऱ्या निर्मितीची फिल्म ‘साली मोहब्बत’ OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे.

कोण आहे दिग्दर्शक? Saali Mohabbat Trailer

या चित्रपटाचे दिग्दर्शन टिस्का चोप्रा यांनी केले आहे. ‘तारे जमीन पर’मधील आईच्या भूमिकेसाठी ओळख मिळवलेल्या टिस्काने या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून पहिल्यांदाच काम केले आहे. तिच्या दिग्दर्शकीय कामाबद्दल ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राधिका आपटे, दिव्येंदु शर्मा आणि अनुराग कश्यप ही तिघेही या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असून, त्यांच्या अभिनयाची झलक ट्रेलरमध्येच प्रभावीपणे जाणवते.

काय आहे कथा

‘साली मोहब्बत’ची कथा (Saali Mohabbat Trailer) फुरसतगड या छोट्या शहरात सुरू होते. या शहरात स्मिता नावाची साधी, शांत महिला राहते. तिची भूमिका राधिका आपटेने साकारली आहे. शहरात अचानक झालेल्या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडते आणि तपासाची दिशा बदलते. तपास जसजसा पुढे जातो तसतसे संशयाचे सावट स्मितावर येऊ लागते. स्थानिक पोलिस अधिकारी रतन तिची चौकशी करत राहतो आणि तिच्या आयुष्यात विचित्र गुंतागुंत निर्माण होते. संपूर्ण कथानक थरार, सस्पेन्स आणि अनपेक्षित घडामोडींनी भरलेले आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवण्याची क्षमता या कथेत दिसते.

जिओ स्टुडिओज आणि मनीष मल्होत्रा यांच्या स्टेज5 प्रोडक्शनद्वारे निर्मित हा चित्रपट आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल IFFI आणि शिकागो साउथ एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये आधीच प्रशंसित झाला आहे. त्यानंतर आता ‘साली मोहब्बत’ हा सिनेप्रेमींसाठी OTT वर उपलब्ध होत आहे. हा चित्रपट १२ डिसेंबरपासून ZEE5 वर प्रदर्शित होणार असून, थरारप्रेमी प्रेक्षकांसाठी हा एक आकर्षक आणि तीव्र अनुभव ठरणार आहे.

ताज्या बातम्या