मराठी कलाक्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक सचिन पिळगावकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत, आणि यावेळी कारण ठरलंय त्यांनी सांगितलेला एक भावनिक, पण तितकाच चर्चास्पद किस्सा. ज्येष्ठ निर्माते राजकुमार बडजात्या यांच्या निधनाबाबत (Sachin Pilgaonkar On Rajkumar Barjatya) त्यांनी सांगितलेला अनुभव सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र या कथेमागचं वास्तव, त्यातील भावना आणि नेटकऱ्यांची संमिश्र प्रतिक्रिया, यामुळे पुन्हा एकदा ‘कथा सांगणाऱ्या’ सचिन यांचं व्यक्तिमत्व चर्चेत आलं आहे.
काय आहे नेमकं प्रकरण? (Sachin Pilgaonkar On Rajkumar Barjatya)
एका व्हिडीओमध्ये सचिन पिळगावकर सांगतात की, बडजात्या यांचं आरोग्य अत्यवस्थ असताना त्यांच्या नातवाने विचारलं “आजोबा, काही इच्छा आहे का?” त्यावर त्यांनी उत्तर दिलं, “मला सचिनचं ‘शाम तेरी बंसी पुकारे राधा नाम’ हे गाणं बघायचं आहे.” नातवाने लगेच YouTube वर ते गाणं दाखवलं आणि गाणं पाहिल्यानंतरच बडजात्या यांनी अखेरचा श्वास घेतला, असं सचिन भावुकपणे सांगतात.

भावनिक कथन की अतिशयोक्ती?
सचिन पिळगावकरांनी किस्सा सांगताना भावूक होऊन डोळे पुसताना दिसतात. हे कथन जरी त्यांच्या दृष्टीने खूप खास आणि हृदयस्पर्शी असलं, तरी अनेक नेटकऱ्यांनी त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. काहींनी विचारलं, त्या काळात YouTube आणि मोबाईल होते का?, तर काहींनी हा किस्सा ‘फिल्मी’ असल्याची टीका केली. काही यूजर्सनी टिप्पणी केली की, सचिनजी नेहमी अशा लोकांच्याच आठवणी सांगतात, जे आता हयात नाहीत. (Sachin Pilgaonkar On Rajkumar Barjatya)
सचिन पिळगावकर हे गेल्या काही वर्षांत त्यांच्या अनुभवांच्या कथांनी अनेकदा चर्चेत राहिले आहेत. त्यांच्या किस्स्यांत एक प्रकारची ‘थिएट्रिकल प्रेझेंटेशन’ची छटा दिसते, असं अनेकांचं मत आहे. ज्येष्ठ कलाकारांच्या अनुभवांमध्ये कधी कधी भावना, आठवणी आणि वास्तव यांची सरमिसळ होते. तेव्हा अशा गोष्टींकडे केवळ ट्रोलिंगच्या नजरेने पाहणं योग्य नाही, तसंच त्या अंधश्रद्धेप्रमाणे स्वीकारणंही टाळायला हवं. सचिन पिळगावकरांनी हा प्रसंग कोणत्या भावनेतून सांगितला, हे समजून घेण्याची गरज आहे. मात्र, कलाकारांचं कथाकथन हे केवळ ‘कथा’ म्हणून ऐकणंही कधी कधी योग्य ठरतं.











