बॉलीवूडचा भाईजान सलमान खानला (Salman Khan) थेट दहशतवादी म्हणून घोषित करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे. यामागचे निमित्त ठरले ते सलमान खानने पाकिस्तान विरुद्ध केलेल्या एका विधानाचं. सौदी अरेबियातील एका कार्यक्रमात बलुचिस्तान आणि पाकिस्तान यांचा वेगवेगळा उल्लेख केला. यावरून पाकिस्तानला चांगल्याचा मिरच्या झोंबल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या शाहबाज सरकारने सलमान खानला थेट दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे.
सलमानला फोर्थ शेड्युलमध्ये टाकलं- Salman Khan
सलमान खानला दहशतवादी घोषित करण्याबाबत पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केली आहे. पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने सलमानला फोर्थ शेड्युलमध्ये टाकलं आहे. हे दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत येते आणि त्या यादीतील व्यक्तींवर पाकिस्तानमध्ये कायदेशीर कारवाई होऊ शकते. यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. याप्रकरणी सलमान किंवा त्याच्या टीमकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही.

काय म्हणाला होता सलमान ?
सौदी अरेबियाच्या रियाध शहरात झालेल्या ‘Joy Forum 2025’ या कार्यक्रमात सलमान खान (Salman Khan) यांनी भारतीय चित्रपटांच्या जागतिक लोकप्रियतेवर बोलताना म्हटले होते की, “या वेळी जर तुम्ही एखादी हिंदी फिल्म बनवली आणि ती इथे (सौदी अरेबिया) रिलीज केली, तर ती सुपरहिट होईल. जर तुम्ही तमिळ, तेलुगू किंवा मल्याळम फिल्म बनवली, तरी ती शेकडो कोटींचा व्यवसाय करेल. कारण इथे इतर देशांमधून बरेच लोक आलेले आहेत. इथे बलुचिस्तानचे लोक आहेत, अफगानिस्तानचे लोक आहेत, पाकिस्तानचे लोक आहेत… सगळे इथे काम करत आहेत. या विधानात सलमान खानने बलुचिस्तानचा उल्लेख पाकिस्तानपासून वेगळा करून केल्यामुळेच हा मुद्दा वादग्रस्त ठरला. अनेक पाकिस्तानी नेटकऱ्यांनी यावर संताप व्यक्त केला होता.
दरम्यान, बलुचिस्तान हा पाकिस्तानमधील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रांत मानला जातो. या भागात ग्वादर बंदरगाह तसेच चीन-पाकिस्तान आर्थिक प्रकल्प (CPEC) यांसारख्या सामरिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या योजना कार्यरत आहेत. मात्र, अनेक दशकांपासून बलुच लोकसंख्येला पाकिस्तान सरकारकडून आर्थिक, सामाजिक आणि राजकीय पातळीवर भेदभावाचा सामना करावा लागत आहे. यामुळे त्या भागात स्वतंत्रतेच्या मागण्या, हिंसक चळवळी आणि सशस्त्र संघर्ष घडत आहेत. या पार्श्वभूमीवर सलमान खान यांचे वक्तव्य अधिकच लक्ष वेधून घेणारे ठरले.