Salman Khan : सलमान खानच्या ‘बलुचिस्तान-पाकिस्तान’ वक्तव्यामुळे सोशल मीडियावर खळबळ

Asavari Khedekar Burumbadkar

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेते सलमान खान (Salman Khan) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते सौदी अरेबियात झालेल्या एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात बोलताना दिसत आहेत, जिथे त्यांनी ‘बलुचिस्तान’ आणि ‘पाकिस्तान’ यांचा वेगवेगळा उल्लेख केला आहे. या विधानानंतर सोशल मीडियावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोकांनी याला जिभेची चूक मानले, तर काहींनी यामागे राजकीय हेतू असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

काय म्हणाला सलमान (Salman Khan)

हा व्हिडिओ सौदी अरेबियाच्या रियाध शहरात झालेल्या ‘Joy Forum 2025’ या कार्यक्रमाचा आहे. या कार्यक्रमात शाहरुख खान आणि आमिर खान यांचाही सहभाग होता. याच कार्यक्रमात सलमान खान (Salman Khan) यांनी भारतीय चित्रपटांच्या जागतिक लोकप्रियतेवर बोलताना म्हटले, “या वेळी जर तुम्ही एखादी हिंदी फिल्म बनवली आणि ती इथे (सौदी अरेबिया) रिलीज केली, तर ती सुपरहिट होईल. जर तुम्ही तमिळ, तेलुगू किंवा मल्याळम फिल्म बनवली, तरी ती शेकडो कोटींचा व्यवसाय करेल. कारण इथे इतर देशांमधून बरेच लोक आलेले आहेत. इथे बलुचिस्तानचे लोक आहेत, अफगानिस्तानचे लोक आहेत, पाकिस्तानचे लोक आहेत… सगळे इथे काम करत आहेत.”

सलमानच्या विधानाने वाद उफाळणार??

या विधानात त्यांनी बलुचिस्तानचा उल्लेख पाकिस्तानपासून वेगळा करून केल्यामुळेच हा मुद्दा वादग्रस्त ठरला आहे. अनेक पाकिस्तानी नेटकऱ्यांनी यावर संताप व्यक्त केला असून, काही भारतीय वापरकर्ते मात्र सलमानने एका संवेदनशील विषयाकडे सहजपणे लक्ष वेधल्याचे म्हणत आहेत.

बलुचिस्तान हा पाकिस्तानमधील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रांत मानला जातो. या भागात ग्वादर बंदरगाह तसेच चीन-पाकिस्तान आर्थिक प्रकल्प (CPEC) यांसारख्या सामरिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या योजना कार्यरत आहेत. मात्र, अनेक दशकांपासून बलुच लोकसंख्येला पाकिस्तान सरकारकडून आर्थिक, सामाजिक आणि राजकीय पातळीवर भेदभावाचा सामना करावा लागत आहे. यामुळे त्या भागात स्वतंत्रतेच्या मागण्या, हिंसक चळवळी आणि सशस्त्र संघर्ष घडत आहेत.

या पार्श्वभूमीवर सलमान खान यांचे वक्तव्य अधिकच लक्ष वेधून घेणारे ठरले आहे. सोशल मीडियावर काही जणांनी म्हटले आहे की त्यांनी केवळ स्थानिक समुदायांचा उल्लेख करताना चुकून ही गोष्ट बोलली असावी, तर काही जण असा दावा करत आहेत की हे वक्तव्य विचारपूर्वक आणि जाणूनबुजून केले गेले आहे.

सध्या तरी सलमान खान किंवा त्यांच्या टीमकडून या संपूर्ण प्रकरणावर कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे चर्चेला अजूनच ऊत आला आहे. सोशल मीडियावर यावरून वादविवाद सुरू असून, काही जण हे वक्तव्य राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे मानत आहेत, तर काही जण सलमानच्या भाषणातील एक साधी चूक म्हणून पाहत आहेत. या प्रकरणात पुढे काय घडते, सलमान यावर कोणती भूमिका घेतात आणि पाकिस्तानी माध्यमे व प्रशासन यावर कशी प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

ताज्या बातम्या