Salman Khan : जेव्हा सलमान खानकडे नव्हते पंक्चर वाल्याला देण्यासाठी पैसे; काय आहे नेमका किस्सा

Asavari Khedekar Burumbadkar

बॉलिवूडचा ‘भाईजान’ म्हणून ओळखला जाणारा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) आज करोडो रुपये कमावतो, लक्झरी कार्समध्ये फिरतो आणि चाहत्यांच्या प्रेमाचा वर्षाव त्याच्यावर होत असतो. मात्र एक काळ असा होता, जेव्हा सलमानकडे सायकलला हवा भरवण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. ही घटना आज जरी मजेशीर वाटत असली तरी त्या छोट्याशा प्रसंगाने त्याला आयुष्यभरासाठी एक मोठा धडा दिला.

काय आहे किस्सा?

सलमान खानने एका जुन्या मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. त्याने सांगितले की, आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात तो सायकलवरून फिरत असे आणि जवळच असलेल्या एका पंक्चरवाल्याकडे सायकलला हवा भरवायला जात असे. त्या वेळी तो पंक्चरवाला २५ पैसे घेत असे. काही वर्षांनंतर, सलमान सुपरस्टार बनल्यानंतर एकदा तो आणि अभिनेत्री कतरिना कैफ बांद्र्यात सायकल चालवत होते. त्या वेळी सलमानने पुन्हा त्याच पंक्चरवाल्याकडे जाऊन म्हटलं  “हवा भर ना.”

तेव्हा त्या पंक्चरवाल्याने सलमानकडे (Salman Khan) बारकाईने पाहिलं आणि म्हणाला, “बाबा, तू मला आठ रुपये देणे आहेस.” सलमानला आश्चर्य वाटलं. त्याने विचारलं, “आठ रुपये?” त्यावर तो म्हणाला, “हो, तू आधी इथे सायकलला हवा भरवायचास आणि पैसे बाकी ठेवलेस.” सलमानला ते ऐकून हसू आलं. त्याला जाणवलं की तो माणूस त्याला ओळखतो, पण त्याला हे माहीत नव्हतं की समोर उभा असलेला व्यक्ती आता बॉलिवूडचा मोठा सुपरस्टार आहे.

सलमानने त्या पंक्चरवाल्याला विचारलं, “आता किती घेतोस हवा भरण्याचे?” त्यावर पंक्चरवाला म्हणाला, “आता दोन रुपये घेतो, कारण २५ पैशांचे दिवस गेले.” सलमान म्हणाला, “ठीक आहे, मी घरून पैसे पाठवतो.” पण त्या माणसाने उत्तर दिलं, “नाही, सायकल इथेच ठेवून जा.” ते ऐकून सलमान क्षणभर गप्प झाला, कारण त्याच्याकडे त्या वेळी खरोखरच पैसे नव्हते. त्याच वेळी कतरिना कैफ त्याच्यासोबत होती आणि आसपास लोकांची गर्दी जमली होती, त्यामुळे परिस्थिती थोडी अवघडली.

तेव्हा सलमानने गर्दीत उभ्या असलेल्या एका अनोळखी व्यक्तीकडे पाहून विचारलं, “तुझ्याकडे पैसे आहेत का यार?” त्या व्यक्तीने आपलं पर्स काढून सलमानसमोर धरलं आणि म्हणाला, “जितके हवे तितके घे.” सलमानने त्याच्याकडून ८ रुपये घेतले, पंक्चरवाल्याला दिले आणि नंतर त्या व्यक्तीला ९२ रुपये परत केले. हा छोटा प्रसंग जरी साधा होता, तरी सलमानला त्यातून पैशांची खरी किंमत समजली.

तेव्हा समजल पैशाचे महत्व

सलमानने त्या वेळी सांगितलं होतं, “त्या दिवशी मला उमगलं की पैसा खूप महत्त्वाचा असतो, कारण त्याच्या मदतीने आपण इतरांना मदत करू शकतो. पण जेव्हा तुमच्याकडे खूप पैसा असतो, तेव्हा तो फक्त पैसा राहतो, त्याची स्वतःची किंमत राहत नाही.” त्याने पुढे म्हटलं, “आपण कितीही श्रीमंत झालो तरी साधेपणा आणि माणुसकी या गोष्टी विसरू नयेत. मी त्या पंक्चरवाल्याला आजही विसरलेलो नाही.”

सलमान खानचा हा किस्सा पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला असून चाहत्यांनी त्याच्या नम्रतेचं आणि साधेपणाचं कौतुक केलं आहे. काहींनी तर लिहिलं, “भाईजान फक्त पैशाने श्रीमंत नाहीत, तर मनानेही मोठे आहेत.” या घटनेतून सलमान खानने दिलेला संदेश स्पष्ट आहे. पैसा येतो आणि जातो, पण नम्रता आणि माणुसकी हीच खरी संपत्ती आहे..

ताज्या बातम्या