Sameer Wankhede : समीर वानखेडेंनी ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ वर दाखल केला मानहानीचा दावा

Asavari Khedekar Burumbadkar

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) चे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी नेटफ्लिक्सवरील ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या वेब सिरीजविरोधात मानहानीचा दावा दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केला आहे. विशेष बाब म्हणजे ही सिरीज अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या प्रकरणाशी संबंधित असल्याचं समजतं. वानखेडे यांच्या मते, या सिरीजमध्ये त्यांचं विडंबन करत त्यांच्या प्रतिमेला आणि व्यक्तिमत्वाला ठपका लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

अंमली पदार्थांविरोधात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा अपमान

याबाबत समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, या सिरीजचा त्यांच्या नोकरीशी थेट संबंध नाही, मात्र ही गोष्ट त्यांच्या आत्मसन्मान आणि वैयक्तिक प्रतिष्ठेशी निगडित आहे. त्यांनी असेही सांगितले की त्यांनी स्वतः वैयक्तिकरित्या दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्यामुळे न्यायालयीन कार्यवाहीवर भाष्य करणं टाळत आहेत. वानखेडे यांचा आरोप आहे की, ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या सिरीजमधून केवळ त्यांचाच नव्हे, तर अंमली पदार्थांविरोधात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा देखील अपमान करण्यात आला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सिरीजमधून विडंबन आणि उपरोधाच्या माध्यमातून एक व्यक्तीकेंद्रित चित्रण करण्यात आलं आहे, ज्याचा परिणाम त्यांच्या सामाजिक आणि कौटुंबिक आयुष्यावर झाला आहे.

वानखेडेंच्या कुटुंबाला धमकीचे मेसेज – Sameer Wankhede

या सिरीजनंतर वानखेडे यांच्या कुटुंबियांना परदेशातून, विशेषतः पाकिस्तान, युएई आणि बांगलादेशमधून, द्वेषमूलक आणि धमकीचे संदेश मिळू लागले आहेत. समीर वानखेडे यांनी स्पष्ट केलं की त्यांच्या पत्नी आणि बहिणीला सोशल मीडियावरून धमक्या मिळत असून, त्यासंदर्भात ते पोलिसांकडे सातत्याने तक्रारी करत आहेत. त्यांनी असेही म्हटलं की, हा त्रास त्यांच्या अधिकृत कामकाजामुळे नसून, वेगळी मानसिक वेदना देण्याचा प्रकार आहे. या याचिकेच्या पार्श्वभूमीवर, दिल्ली उच्च न्यायालयाने रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड, नेटफ्लिक्स आणि इतर संबंधित पक्षांना समन्स बजावले आहेत. न्यायमूर्ती पुरुषेन्द्र कुमार कौरव यांच्या खंडपीठाने सर्व प्रतिवाद्यांना सात दिवसांच्या आत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला आहे. त्यानंतर, वानखेडे यांना तीन दिवसांच्या आत त्या उत्तराला प्रत्युत्तर देण्याची संधी दिली जाईल.

कोर्टाने याचिकाकर्त्याला सर्व प्रतिवाद्यांना याचिकेची प्रत देण्याचे आदेश दिले आहेत. पुढील सुनावणी ३० ऑक्टोबर २०२५ रोजी होणार आहे. मात्र, न्यायालयाने सध्या वानखेडेंना कोणताही तात्पुरता दिलासा दिलेला नाही आणि त्यांना १० दिवसांनंतर पुन्हा हजर राहण्यास सांगितले आहे. समीर वानखेडे यांच्या या कायदेशीर पावलामुळे मनोरंजनविश्वात आणि कायदेशीर वर्तुळात मोठ्या प्रमाणावर चर्चेला उधाण आले आहे. ही केस केवळ एखाद्या अधिकाऱ्याच्या मानहानीशी संबंधित नसून, माध्यम स्वातंत्र्य, वैयक्तिक प्रतिष्ठा आणि सोशल मीडियावरच्या प्रभावी दुष्परिणामांबाबतही व्यापक चर्चा घडवणारी ठरणार आहे.

ताज्या बातम्या