संजय दत्तला चाहतीने दिली ७२ कोटींची संपत्ती, पण…

Jitendra bhatavdekar

बॉलिवूडमधील स्टार्सची फॅन फॉलोइंग लपून राहिलेली नाही. मात्र, एखादा चाहता जर त्याच्या आवडत्या अभिनेत्यासाठी काहीतरी खास केले असेल, तर ती घटना नक्कीच विशेष ठरते. अशीच एक घटना अभिनेता संजय दत्त याच्या बाबतीत घडली आहे. त्याच्या एका महिला चाहतीने संजय दत्तसाठी थेट ७२ कोटी रुपयांची मालमत्ता त्यांच्या नावावर केली होती.

ही गोष्ट खुद्द संजय दत्त याने ‘Curly Tales’ ला दिलेल्या एका मुलाखतीत उघड केली आहे. जेव्हा २०१८ मध्ये घडलेल्या या प्रकाराबद्दल त्याला विचारण्यात आले, तेव्हा त्याने याची पुष्टी केली आणि सांगितले की, त्याने ती संपत्ती परत चाहतीच्या कुटुंबीयांना दिली होती.

चाहतीने संपत्ती संजय दत्तच्या नावावर केली होती

२०१८ मध्ये “निशा पाटील” नावाच्या एका चाहतीने, जी आजारी होती, तिने तिची सर्व संपत्ती संजय दत्त याच्या नावावर केली होती. तिच्या मृत्यूनंतर बँकेला तसे स्पष्ट निर्देश दिले होते. त्या वेळी ही बातमी मोठ्या प्रमाणावर चर्चेत आली होती.

या घटनेची पुन्हा एकदा आठवण करून देताना संजय दत्त याने सांगितले की, आता ती मालमत्ता परत तिच्या कुटुंबीयांना दिली होती. संजय दत्त यांच्या या निर्णयाचे आज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

वैयक्तिक जीवन वादग्रस्त

संजय दत्त यांनी १९८१ मध्ये ‘रॉकी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ‘नाम’, ‘साजन’, ‘खलनायक’, ‘वास्तव’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ अशा अनेक हिट चित्रपटांनी चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण केलं. मात्र, त्याचे वैयक्तिक जीवन वादग्रस्त राहिले आहे. १९९३ च्या बॉम्ब स्फोट प्रकरणात त्याचे नाव आल्यामुळे तो अनेक वर्षे चर्चेत राहिला. २०१६ मध्ये त्याने आपल्या ५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा पूर्ण केली.

ताज्या बातम्या