बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचा पती उद्योजक राज कुंद्रा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दोघांवरही 60 कोटींच्या फसवणुकीचा आरोप झाला असून मुंबई पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध लुकाऊट नोटीस जारी केली आहे. हे नेमकं प्रकरण आहे तरी काय शिल्पा शेट्टी यात कशाप्रकारे अडकली याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.
काय आहे नेमकं प्रकरण? Shilpa Shetty
तर या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात मुंबईतील एका बिझनेस मॅन ने केलेल्या तक्रारीमुळे झाली…. दीपक कोठारी नावाच्या या बिझनेसमनने शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या विरोधात तक्रार दाखल करत म्हटलं की या दोघांनी त्याच्या कंपनीतून 60.4 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती आणि कर्जही घेतलं होतं. हा सगळा व्यवहार 2015 ते 2023 या काळात झाला होता परंतु कोठारी यांचे म्हणणं असं आहे की शिल्पा शेट्टीने राज कुंद्रा यांनी या पैशाचा वापर व्यावसायिक कारणासाठी वापरण्याऐवजी वैयक्तिक कारणासाठी वापरला. सुरुवातीला त्यांना सांगण्यात आले की ही रक्कम कर्ज म्हणून घेतली जात आहे, परंतु नंतर ती टॅक्स वाचवण्याचा दावा करून गुंतवणूक म्हणून दाखवण्यात आली. कोठारी म्हणाले की या रकमेवर १२ टक्के वार्षिक व्याज देण्याचेही आश्वासन देण्यात आले होते.

दीपक कोठारी यांनी असेही सांगितले की शिल्पा शेट्टी यांनी स्वतः त्यांना यासाठी लेखी हमी दिली होती, परंतु नंतर शिल्पाने फर्मच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. कोठारी म्हणाले की त्यांना खूप नंतर कळले की कंपनीविरुद्ध १.२८ कोटी रुपयांचा दिवाळखोरीचा खटला देखील सुरू आहे.
जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
तक्रार मिळाल्यानंतर १४ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईतील जुहू पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) तपास आणखी जलद केला. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा हे दोघेही सातत्याने आंतरराष्ट्रीय प्रवास करत असल्याने आणि परदेशात राहण्याची शक्यता असल्याने त्यांनी देश सोडून जाऊ नये यासाठी त्यांच्या विरोधात पोलिसांनी लुक आऊट नोटीस जारी केली आहे











