राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 चा दिमाखदार सोहळा राजधानी दिल्लीत पार पडला असून यंदा मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाचा क्षण ठरला. साने गुरुजींच्या आत्मकथनावर आधारित ‘श्यामची आई’ (Shyamchi Aai) या चित्रपटाने ‘सर्वोत्तम मराठी चित्रपट’ म्हणून गौरव मिळवला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिग्दर्शिका अमृता अरुणराव यांनी महाराष्ट्राची पारंपरिक नऊवारी नेसून हा पुरस्कार स्वीकारला. त्यांच्या या मराठमोळ्या सादरीकरणाची विशेष दखल घेण्यात आली.
साने गुरुजींच्या आठवणींचं प्रभावी चित्रण – Shyamchi Aai
‘श्यामची आई’ ही कथा स्वातंत्र्यपूर्व भारतातल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबाच्या संघर्षांची आणि एका मातृहृदयाच्या अपार मायेची आहे. लहान श्यामच्या दृष्टिकोनातून उलगडणारी ही कथा समाज, संस्कार आणि आईचं प्रेम या त्रिसूत्रीभोवती फिरते. ओम भुतकर यांनी साकारलेले साने गुरुजी तुरुंगात असताना आपले बालपण आणि आईची आठवण कैद्यांसोबत शेअर करताना दिसतात. त्यांचं बाल रूप शर्वा गाडगीळ यांनी साकारलं आहे. Shyamchi Aai

जुन्या क्लासिकला नवसंजीवनी
हा चित्रपट 1953 मध्ये आलेल्या त्याच नावाच्या चित्रपटावर आधारित असला तरी, नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने, भावनिक आणि दृश्य मांडणीच्या बाबतीत तो अधिक समृद्ध ठरतो. संदीप पाठक, गौरी देशपांडे आणि इतर कलाकारांनी अभिनयात जान ओतली असून, चित्रपटाच्या पार्श्वसंगीत, छायाचित्रण आणि सादरीकरणातून त्या काळाचा गंध आजच्या पिढीपर्यंत पोहचवण्यात यश मिळालं आहे.
राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये इतरांचा देखील दबदबा
या वर्षीच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठीसह इतर भाषांतील चित्रपटांचाही चांगलाच प्रभाव दिसून आला.
* सर्वोत्तम अभिनेत्री – राणी मुखर्जी
* सर्वोत्तम अभिनेते – शाहरुख खान आणि विक्रांत मेस्सी
* सर्वोत्तम फिचर फिल्म – 12वी फेल
* सर्वोत्तम हिंदी चित्रपट – कटहल
* सर्वोत्तम दिग्दर्शक – सुदीप्तो सेन (द केरळ स्टोरी)
* सर्वोत्तम साउंड डिझाईन आणि बॅकग्राउंड स्कोअर – अॅनिमल
* सर्वोत्तम मेकअप आणि कॉस्ट्युम डिझाईन – सॅम बहादूर
* दादासाहेब फाळके पुरस्कार – मोहनलाल
मराठी चित्रपटसृष्टीसाठी प्रेरणादायी क्षण
‘श्यामची आई’ च्या यशामुळे मराठी चित्रपट पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर चमकला आहे. हे यश केवळ अमृता अरुणराव यांचं नाही, तर संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीच्या दर्जेदार कामाचं प्रतीक आहे. साने गुरुजींनी लिहिलेली ही कथा कालातीत असून, आजच्या काळातही तिचं भावनिक आणि सामाजिक महत्त्व अधिकच वाढलं आहे.