क्रिकेटपटू स्मृती मंधाना हिच्यावर सलग दु:खाचे ढग दाटून आले आहेत. स्मृती आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा विवाह 23 नोव्हेंबरला ठरलेला होता. दोन्ही कुटुंबांमध्ये तयारी जोरात सुरू असतानाच अनपेक्षितपणे स्मृतींचे वडील श्रीनिवास मंधाना यांची तब्येत गंभीर बिघडली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेऊन ICU मध्ये दाखल करण्यात आले. या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे मंधाना आणि मुच्छल परिवारांनी विवाह पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.याच पार्श्वभूमीवर आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
नेमकं काय घडलं ?
स्मृतीचा होणारा नवरा पलाश मुच्छल यांची तब्येतही बिघडल्याने कुटुंबीयांची चिंता अधिक वाढली. पलाश यांना सांगलीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबत बोलताना एका जवळच्या सूत्राने सांगितले की, पलाश यांना वायरल इन्फेक्शनसोबतच वाढलेल्या ऍसिडिटीचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज भासली. सुदैवाने परिस्थिती गंभीर नव्हती आणि उपचार घेतल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

पलाश यांच्या आई अमिता मुच्छल यांनीही त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती देताना सांगितले की, पलाश आता मुंबईत परतले असून घरी विश्रांती घेत आहेत. त्यांनी यावेळी हेही सांगितले की सततचा ताण, तणाव आणि मानसिक दबाव याचा त्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे त्यांना काही दिवस पूर्ण विश्रांतीची गरज आहे.
दोन्ही कुटुंबे संकटात
स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांच्या विवाहाआधीच आलेल्या या सलग आरोग्यसंकटामुळे दोन्ही कुटुंबे तणावाखाली आहेत. मात्र सध्या सर्वात दिलासादायक गोष्ट म्हणजे स्मृतींच्या वडिलांची तसेच पलाश मुच्छल यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती मिळत आहे. आगामी काही दिवसांत त्यांच्या आरोग्यात आणखी सुधारणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.











