तान्या मित्तलचे नशीब फळफळले; सलमान खानच्या शोमध्ये एकता कपूरकडून मोठी ऑफर

Asavari Khedekar Burumbadkar

‘बिग बॉस 19’ सुरू झाल्यापासून सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या स्पर्धकांपैकी एक नाव म्हणजे तान्या मित्तल. शोमध्ये प्रवेश केल्यापासून तिने आपल्या वक्तव्यांमुळे आणि बिनधास्त स्वभावामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता तान्याच्या करिअरला नवा वळण देणारी एक मोठी घटना घडली आहे. निर्माता-निर्दर्शक एकता कपूर यांनी तान्याला एका नव्या शोची ऑफर दिली असून तिचा आनंद व्यक्त करता येणार नाही असा झाला आहे.

काय आहे ऑफर

या आठवड्यातील ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये एकता कपूर विशेष पाहुण्या म्हणून ‘बिग बॉस 19’च्या मंचावर दिसणार आहेत. एपिसोड टेलिकास्ट होण्यापूर्वी प्रदर्शित केलेल्या प्रोमोमध्ये दिसते की एकता कपूर आपले नवीन एस्ट्रो अॅप लॉन्च करत आहेत. त्याच अॅपच्या प्रमोशनसाठी त्या घरात आल्या आणि याच दरम्यान त्यांनी तान्या मित्तलला त्यांच्या आगामी शोसाठी निवडण्याची इच्छा व्यक्त केली.

फक्त तान्याच नव्हे, तर संगीतकार अमाल मलिक यांनाही एकता कपूरने कास्ट करण्याचा प्रस्ताव दिला. प्रोमोमध्ये एकता म्हणताना दिसतात, “सलमान सरच्या शोमध्ये ऑफर देणे हा माझा एक रिवाजच झाला आहे. दोन लोकांना मी कास्ट करू इच्छिते—पहिला आहे अमाल, जो अभिनेता नाही; आणि दुसरी म्हणजे ही ‘दुनिया पित्तल दी’, तान्या. तिच्या राहूमध्ये १० आहे आणि म्हणतात ना, ज्यांचा राहू १०व्या घरात असतो, त्यांची दुनिया त्यांच्या मुठीत असते.”

भावूक झाली तान्या 

एकताचे हे शब्द ऐकताच तान्या अत्यंत भावूक आणि आनंदित होते. ती म्हणते, “मॅम, हे माझ्यासाठी स्वप्न सत्यात उतरल्‍यासारखे आहे.” यानंतर सलमान खान मजेशीर अंदाजात प्रतिक्रिया देतात, “पण भूमिका गरीब मुलीची आहे… कशी करशील?” त्यांच्या या विनोदावर सगळे हसून लोटपोट होतात.

ग्वालियरची रहिवासी असलेली तान्या मित्तल एक यशस्वी बिजनेसवुमन आहे. सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत आणि ‘बिग बॉस 19’मध्येही प्रेक्षक तिच्या व्यक्तिमत्त्वाला पसंती देत आहेत. सध्या शो अंतिम टप्प्यात असून 7 डिसेंबरला ग्रँड फिनाले पार पडणार आहे. आता सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे की, अखेर विजेतेपदाची ट्रॉफी कोण घरी घेऊन जाणार?

ताज्या बातम्या