Thamma ने अँडव्हान्स बुकिंगमध्ये केली कोटींची कमाई

Asavari Khedekar Burumbadkar

‘स्त्री’, ‘रूही’, ‘भेड़िया’, ‘मुंज्या’ आणि ‘स्त्री 2’ यांसारख्या हॉरर-कॉमेडी चित्रपटांच्या यशानंतर प्रसिद्ध निर्माता दिनेश विजान एक नवा धमाका घेऊन येत आहेत. ‘थम्मा’ हे मॅडॉक फिल्म्सच्या हॉरर युनिव्हर्समधील सहावे पर्व असणार असून, हा चित्रपट 21 ऑक्टोबर रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराना, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि रश्मिका मंदाना प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. सध्या हा चित्रपट जोरदार प्रमोशनच्या फेरीत असून, चाहत्यांमध्येही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

अॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोटींची कमाई

चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवातीला सौम्य प्रतिसाद मिळाला, मात्र नंतरच्या दिवशी बुकिंगमध्ये लक्षणीय वाढ झाली. 17 ऑक्टोबरपासून अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली होती. पहिल्या दिवशी तुलनेने कमी प्रतिसाद मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 18 ऑक्टोबरला, ऑर्गेनिक तिकीट विक्रीमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली. इंडस्ट्री ट्रॅकर सैकनिल्कच्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 11 वाजेपर्यंत ‘थम्मा’ने तिकीट विक्रीतून सुमारे 1.7 कोटी रुपयांची कमाई केली. यासोबतच ब्लॉक बुकिंगमधून 5.14 कोटी रुपयांचा आकडा गाठत, एकूण अॅडव्हान्स कलेक्शन जवळपास 6.84 कोटी रुपये इतके झाले आहे.

तब्बल 10,424 शो होणार

भारतभरात ‘थम्मा’चे तब्बल 10,424 शो होणार असून, यात हिंदी 2D मध्ये सर्वाधिक 10,039 शो आहेत. त्याशिवाय 100 IMAX 2D शो आणि 91 4DX शो नियोजित आहेत. याशिवाय तेलुगू आवृत्तीसाठी देशभरात 194 शो आयोजित करण्यात आले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर ट्रेड अ‍ॅनालिस्ट्सचा अंदाज आहे की, ‘थम्मा’ पहिल्याच दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर सुमारे 30 कोटी रुपयांची कमाई करू शकतो.

रविवारी सकाळपर्यंत हिंदी 2D वर्जनसाठी 57,417 तिकिटांची विक्री झाली होती. IMAX 2D आणि 4DX शोसाठी अनुक्रमे 1,090 आणि 311 तिकिटे विकली गेली होती. तेलुगू आवृत्तीसाठी सर्व फॉरमॅट्स मिळून 1,123 तिकीटांची विक्री झाल्याचे समोर आले आहे. ही आकडेवारी पाहता, प्रेक्षकांचा उत्साह हळूहळू वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत.

मॅडॉक फिल्म्सच्या या हॉरर-कॉमेडी युनिव्हर्समधील याआधीचे काही चित्रपट, विशेषतः ‘रूही’ आणि ‘भेड़िया’ बॉक्स ऑफिसवर फारशी चमक दाखवू शकले नव्हते. मात्र ‘स्त्री’ आणि अलीकडचा ‘मुंज्या’ या चित्रपटांना प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे ‘थम्मा’कडून निर्मात्यांना आणि चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर, ‘थम्मा’ हा केवळ एक हॉरर-कॉमेडी चित्रपट नसून, मॅडॉक युनिव्हर्सच्या यशाचा पुढचा टप्पा ठरण्याची शक्यता आहे. आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काय कमाल करतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

ताज्या बातम्या