प्रसिद्ध अभिनेता प्रभास पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाकेदार पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. ‘कल्कि 2898 ए.डी.’ नंतर आता तो एका वेगळ्याच शैलीत – हॉरर आणि कॉमेडीच्या मिश्रणात – प्रेक्षकांसमोर येतोय. त्याचा नवा चित्रपट ‘द राजा साब’ (The Raja Saab) सध्या चर्चेत आहे आणि नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतलं आहे अभिनेता संजय दत्तने. संजय दत्त एका पूर्णपणे वेगळ्या आणि धक्कादायक लुकमध्ये दिसतो आहे. त्याचे वाढलेले केस, जाड मिशा आणि प्रभावी व्यक्तिमत्व हे सगळं मिळून त्याला एक रहस्यमय आणि खलनायकी रुपात सादर करतं.
ट्रेलर किती मिनिटांचा? (The Raja Saab)
‘द राजा साब’ ही हॉरर-कॉमेडी प्रकारातील चित्रपट असून, अशा प्रकारात प्रभास पहिल्यांदाच काम करत आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता आहे. ट्रेलरची सुरुवात ‘कोई यहाँ आहा नाचे-नाचे’ या जुन्या गाण्याच्या नवीन रूपात होते, आणि पुढे प्रेक्षकांना रोमांच, विनोद, रोमँस आणि अॅक्शनचा भन्नाट अनुभव मिळतो. चित्रपटात प्रभावी स्पेशल इफेक्ट्स वापरण्यात आले आहेत, जे कथेला अधिक प्रभावी बनवतात. ट्रेलर एकूण ३ मिनिटं ३४ सेकंदांचा असून, त्यात थरारक दृश्ये, रहस्य आणि उत्सुकता निर्माण करणाऱ्या घटना दिसून येतात. (The Raja Saab)

चित्रपट कधी रिलीज होणार?
या चित्रपटात प्रभास आणि संजय दत्तसोबत निधी अग्रवाल, मालविका मोहनन, बोमन ईरानी आणि झरीन वहाब यांसारखे दमदार कलाकार देखील सहभागी आहेत. प्रत्येक पात्राचा लुक, वेशभूषा आणि शैली लक्षवेधी आहे. सुरुवातीला ‘द राजा साब’ हा चित्रपट एप्रिल २०२५ मध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र, काही अपरिहार्य कारणांमुळे त्याच्या प्रदर्शनात विलंब झाला आहे. आता हा चित्रपट ९ जानेवारी २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
जून महिन्यात या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता, ज्याला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. परंतु, ट्रेलरमुळे चित्रपटाबद्दलचा उत्साह वाढला असून, प्रभास आणि संजय दत्तच्या या जोडीची झलक पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.