The Taj Story : ताजमहल’वर खटला? परेश रावलच्या ‘द ताज स्टोरी’ च्या ट्रेलरने उडवली खळबळ!

Asavari Khedekar Burumbadkar

परेश रावल हे बॉलिवूडमधील ज्येष्ठ आणि प्रतिभावान अभिनेते पुन्हा एकदा आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालण्यास सज्ज झाले आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर ‘द ताज स्टोरी’ (The Taj Story) नुकताच प्रदर्शित झाला असून, तो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.या चित्रपटात परेश रावल एका गाईडची भूमिका साकारत असून, तो ताजमहल पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना त्याच्या इतिहासाची माहिती देतो. मात्र या कथेला अनपेक्षित वळण मिळते जेव्हा तोच गाईड ताजमहलवर खटला दाखल करतो. इथून सुरू होते एक तीव्र आणि विचारप्रवृत्त करणारे कोर्टरूम ड्रामा, ज्यात इतिहास, श्रद्धा आणि सत्य यांवर गहन चर्चा घडते.

चित्रपटात दाखवले जाते की इतिहास खरंच तसाच होता का, ज्याप्रमाणे आपल्याला शिकवण्यात आला आहे? की त्यामध्ये सत्ता आणि राजकीय फायद्यांसाठी अनेक गोष्टी दडवण्यात आल्या? ट्रेलरमध्ये काही संवाद खास गाजत आहेत, त्यापैकी एक म्हणजे  “इतिहास सत्ता साठी लिहिला गेला, सत्यासाठी नाही.” अशा संवादांमुळे प्रेक्षकांना अधिक विचार करायला भाग पाडले जाते.

चित्रपटात दिसते ताजमहालची भव्यता – The Taj Story

चित्रपटातील ताजमहलच्या भव्यतेला सुंदर सिनेमॅटोग्राफीने खुलवले आहे. प्रत्येक फ्रेममध्ये ताजमहलचं सौंदर्य ठळकपणे दिसून येतं. कोर्टातील दृश्यांमध्ये परेश रावलचा भावपूर्ण अभिनय आणि त्यांचा ठाम आवाज चित्रपटाला एक वेगळीच उंची देतो.

चित्रपटात कोणाकोणाची मुख्य भूमिका

या चित्रपटात (The Taj Story) परेश रावलसोबत जाकिर हुसैन यांची प्रभावी भूमिका आहे, जे कोर्टातील चर्चांमध्ये त्यांच्यासमोर उभे राहतात. तसेच अमृता खानविलकर, स्नेहा वाघ आणि नमित दास यांच्या देखील महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन तुषार अमरीश गोयल यांनी केलं असून, ‘द ताज स्टोरी’ ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. एकीकडे मनोरंजन आणि दुसरीकडे भारतीय इतिहास व आस्थेवर विचार मांडणारी ही कथा प्रेक्षकांना केवळ पाहायला नव्हे, तर अंतर्मुख व्हायला भाग पाडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या