बॉलीवूडचा बहुआयामी कलाकार फरहान अख्तर पुन्हा एकदा बायोपिक चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाला आहे. फरहान ‘एक्सेल एंटरटेनमेंट’च्या आगामी चित्रपट ‘१२० बहादुर’ मध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ही एक भव्य आणि दमदार अॅक्शन फिल्म असून ती या वर्षी नोव्हेंबरमध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाबाबत आधीपासूनच प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
१४ ऑगस्टला ‘१२० बहादुर’चा टीझर होणार प्रदर्शित
मिळालेल्या माहितीनुसार, ‘एक्सेल एंटरटेनमेंट’ १२० बहादुरचा टीझर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित करण्याच्या तयारीत आहे. हा टीझर ऋतिक रोशन, कियारा अडवाणी आणि ज्युनिअर एनटीआर यांच्या ‘वॉर २’ या अॅक्शन थ्रिलर चित्रपटासोबत मोठ्या पडद्यावर दाखवण्यात येणार आहे. टीझर १४ ऑगस्ट २०२५ रोजी प्रदर्शित होईल.

फरहान अख्तर साकारणार मेजर शैतान सिंह भाटी यांची भूमिका
‘१२० बहादुर’ हा एक उच्च दर्जाचा अॅक्शनपट असून यासाठी मेकर्सनी आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञांची मदत घेतली आहे. ‘लक्ष्य’नंतर एक्सेल एंटरटेनमेंटचा हा आणखी एक आर्मी थीमवर आधारित चित्रपट आहे. यामध्ये फरहान भारताचे परमवीर चक्र विजेते मेजर शैतान सिंह भाटी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.
यापूर्वी फरहानने ‘भाग मिल्खा भाग’ या मिल्खा सिंग यांच्या बायोपिकमध्ये दमदार अभिनय करत प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं. आता तो मेजर भाटींच्या भूमिकेसाठीही विशेष तयारी करत आहे.
कोण होते मेजर शैतान सिंह भाटी?
मेजर शैतान सिंह भाटी हे १९६२ च्या भारत-चीन युद्धातील एक शूरवीर योद्धा होते. त्यांना त्यांच्या असामान्य शौर्यासाठी परमवीर चक्र प्रदान करण्यात आलं होतं. त्यांचा जन्म १९२४ मध्ये राजस्थानमध्ये झाला होता. ते १३ कुमाऊँ रेजिमेंटच्या चार्ली कंपनीचे कमांडिंग ऑफिसर होते.
१८ नोव्हेंबर १९६२ रोजी, मेजर भाटी आणि त्यांच्या ११९ जवानांनी लडाखमधील बर्फाच्छादित रेजांग ला येथे चीनच्या जोरदार हल्ल्याचा सामना करत अतुलनीय शौर्य दाखवले. त्यांच्या शौर्यामुळे चुशूल एअरस्ट्रिपची सुरक्षितता राखली गेली आणि त्यांचं नाव वीरतेच्या इतिहासात अमर झालं.
फरहान अख्तर सध्या ‘डॉन ३’ च्या तयारीतही व्यस्त
‘१२० बहादुर’च्या पोस्ट-प्रॉडक्शनचे काम सध्या वेगात सुरू आहे. एकाच वेळी फरहान अख्तर ‘डॉन ३’ या आपल्या पुढील दिग्दर्शित चित्रपटाच्याही तयारीत व्यस्त आहे, ज्याचे चित्रीकरण जानेवारी २०२६ पासून सुरू होणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग आणि कृती सेनन मुख्य भूमिकेत झळकतील.