BMC – मुंबई पालिका प्रशासनाकडून नोंदणी विवाह करणाऱ्यांसाठी एक आनंदाची आणि महत्वाची बातमी समोर येत आहे. आता नागरिकांना सेवा वेगवान तसेच सुलभ करण्यासाठी पालिका प्रशानाकडून करण्यात येणाऱया प्रयत्नांमध्ये आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडील विवाह नोंदणी सेवा अंतर्गत आता शनिवार व रविवार असे आठवडा अखेरीचे दोन्ही दिवस विवाह नोंदणी (वीकएन्ड मॅरेज रजिस्ट्रेशन सर्व्हिस) करता येईल. विशेष म्हणजे याच दिवशी प्रमाणपत्र देखील मिळणार आहे, अशी पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
शनिवार व रविवार या दोन्ही सुटीच्या दिवशी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत या कालावधीत विवाह नोंदणी सेवा (Week-end Marriage Registration Service) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘जलद विवाह नोंदणी सेवा’
दरम्यान, सोमवार ते शुक्रवार या कालावधीत दररोज होणाऱ्या नोंदणीपैकी २० टक्के नोंदणी या ‘जलद विवाह नोंदणी सेवा’ (फास्ट ट्रॅक मॅरेज रजिस्ट्रेशन सर्व्हिस) म्हणून राखीव राहणार आहेत. या दोन्ही सेवांचा लाभ घेणाऱया दाम्पत्यांना नोंदणी केली, त्याच दिवशी विवाह नोंदणी प्रमाणपत्र दिले जाणार आहे, हे या सेवेचे वैशिष्ट्य असणार आहे. विवाह नोंदणी प्रमाणपत्र हे प्रत्येक दाम्पत्यासाठी महत्त्वाचे दस्तावेज असते. वेगवेगळ्या शासकीय कामकाजासाठी ते आवश्यक असते. अलीकडच्या आकडेवारीनुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये वर्षभरात सुमारे ३० ते ३५ हजार विवाहांची नोंदणी होते. असे असले तरी, वर्षभरात होणारे विवाह पाहता ही आकडेवारी नक्कीच कमी आहे.
शुल्क किती रुपये?
याची कारणे प्रशासनाने शोधली असता लक्षात आले की, मुंबईतील नागरिकांना विवाह नोंदणी प्रक्रियेमध्ये वेळेअभावी अडचणी व गैरसोयी जाणवतात. या अडचणी कमी व्हाव्यात, विवाह नोंदणी प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी पालिकेनं नवे उपक्रम सुरू करण्यात येत आहेत. त्याकरिता विवाह नोंदणी प्रक्रियेमध्ये दोन नवीन सेवा समाविष्ट करण्यात आल्या आहेत. दरम्यान, नवीन सेवांपैकी एक सेवा ही कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांमधील ‘जलद विवाह नोंदणी सेवा’ ही आहे. तर दुसरी आठवडा अखेरीची विवाह नोंदणी सेवा आहे. या दोन्ही सेवांसाठी नियमित नोंदणी शुल्क, अधिक अतिरिक्त शुल्क रुपये २,५०० इतकी एकूण रक्कम आकारण्यात येणार आहे.
