Pandharpur Vitthal Mandir : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील VIP दर्शन 10 दिवस बंद

सध्याच्या डिसेंबर महिन्यात पंढरपूर येथील विठ्ठलाच्या मंदिरात भाविकांचे गर्दी मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

Pandharpur Vitthal Mandir : संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर विठ्ठलाच्या मंदिरातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पंढरपूर मंदिर समितीने 21 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत देवाचे व्हीआयपी दर्शन, टोकन दर्शन आणि ऑनलाइन दर्शन पूर्णपणे बंद केले आहे. सध्याच्या डिसेंबर महिन्यात पंढरपूर येथील विठ्ठलाच्या मंदिरात भाविकांचे गर्दी मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

रांगेतूनच दर्शन घ्यावे लागणार (Pandharpur Vitthal Mandir)

खरं तर डिसेंबर महिन्याच्या शेवटी आणि नववर्षाच्या सुरुवातीला सुट्ट्यांचा काळ असतो. सुट्टी असल्याने अनेक जण या महिन्यात देवदर्शन करतात साहजिकच, महाराष्ट्रातील श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी, तुळजापूर, अक्कलकोट, कोल्हापूर आणि पंढरपुरातही भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. या वाढत्या गर्दीचा अंदाज घेऊनच पंढरपूर मंदिर समितीने VIP दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 21 ते 31 डिसेंबर पर्यंत भाविकांना मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी केवळ दर्शनरांगेतूच जावे लागणार आहे. पंढरपूर मंदिर समितीच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

पाद्यपूजाही पुढील 10 दिवसांसाठी बंद

भाविकांना कमी प्रतीक्षा वेळेत दर्शन मिळावे यासाठी समितीने आणखी एक पाऊल उचलत पाद्यपूजाही पुढील दहा दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे विठ्ठल दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांना गर्दीच्या कालावधीतही कमीत कमी वेळेत दर्शन मिळणे शक्य होणार आहे. तसेच सुट्ट्यांच्या काळातील व्यवस्थापन अधिक प्रभावी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News