Dahisar Fire : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून आग लागण्याच्या घटना काही थांबताना नाव घेत नाहीत. गेल्या आठवड्यात दक्षिण मुंबईत आगीची घटना ताजी असताना आता मुंबईतील उपनगर म्हणजे दहिसर येथे भीषण आग लागलेली आहे. दहिसर पूर्वेकडील एस.व्ही. रोड शांतीनगरमधील न्यू जनकल्याण सोसायटी या २३ मजली इमारतीत भीषण आग लागली आहे. ही आग चौथ्या मजल्यापर्यंत पसरली. त्यामुळे अग्निशमन दलाने अडकलेल्या ३६ जणांची सुटका केली आहे.
80 वर्षीय महिलेचा मृत्यू, 19 जण जखमी
दरम्यान, या आगीत एका ८० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे तर १९ जण जखमी झाल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पण या आगीत धुरामुळे अनेक जण गुदमरले असल्याची माहिती समोर येत आहे. आगीत एका ८० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून, १९ जण जखमी आहेत, यात दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. आगामुळं घाबरलेल्या काही रहिवाशांनी इमारतीच्या बाहेर धाव घेतली. तर काहींनी सुरक्षित ठिकाण म्हणून इमारतीच्या गच्चीवर गेले.
आगीचे कारण काय?
दुसरीकडे ही आग का लागली याची कारणे शोधण्यात येत आहेत. परिसरातील अनेकांनी आग लागलेल्या इमारतीतील रहिवाशांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अनेकांकडून मदतीसाठी हाकही देण्यात येत होती. दरम्यान, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. इमारतीच्या तळघरात असलेल्या दोन मीटर केबिनला आग लागल्यानंतर ही आग पसरत गेली. इलेक्ट्रिक वायर, केबल आदींमुळे आग पसरताना ती इलेक्ट्रिक डक्टमधूनही पसरली. दहिसर पूर्वेला शांतीनगरमध्ये २३ मजली न्यू जनकल्याण सोसायटी आहे. या इमारतीच्या तळमजल्यापासून ते चौथ्या मजल्यापर्यंत आग लागली. इमारतीत झालेल्या प्रचंड धुरामुळे अनेकांना श्वास कोंडला.





