MP Breaking News
Sat, Dec 13, 2025

प्रशासनाने नागरिकांच्या बचाव व मदतकार्याला प्राधान्य द्यावं, अजित पवार यांचे निर्देश

Written by:Astha Sutar
घरात पाणी भरण्याची शक्यता असल्यास सुरक्षितस्थळी आसरा घ्यावा. मुसळधार पाऊस सुरु असलेल्या भागातील नागरिकांनी शक्यतो घरीच थांबावे. आत्यंतिक गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. 

Ajit Pawar – कालपासून मुंबईसह राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान खात्याने मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उद्या रेड अलर्ट आहे. पालघरसाठी यलो अलर्ट आहे. मुंबईची तुंबई झाली आहे, तर राज्यभर काही ठिकाणी दुर्घटना घडल्या आहेत. या धरतीवर प्रशासनाने नागरिकांच्या बचाव व मदतकार्याला प्राधान्य द्यावं, असे निर्देश अजित पवार यांनी दिले आहेत.

यंत्रणांनी सतर्क राहावे…

दरम्यान, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या घाट परिसरात पावसाचा जोर आणखी काही दिवस कायम राहणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्हा यंत्रणांनी सतर्क राहून नागरिकांची सुरक्षितता, बचाव व मदतकार्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. उपाययोजना तात्काळ राबवाव्यात… नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवावे…असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले.

बारामतीत पावसाच्या परिस्थितीची पाहणी…

दुसरीकडे अजित पवारांनी पुणे ग्रामीण भागातील गावांचा दौरा केला, यासह मंत्रालयातील राज्यस्तरीय आपत्ती नियंत्रण व व्यवस्थापन केंद्राकडूनही राज्यातील जिल्ह्यातील धरणांची स्थिती, स्थानिक परिस्थिती आणि पावसाचा आढावा घेतला. बारामतीत झालेल्या मुसळधार पावसाचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. तसेच शेती पिकांचे, पशुधनाचे, घरांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करुन मदती पोहचवावी असे निर्देश ही पवारांनी दिले.