सोयाबीनच्या दराबाबत बाजार समित्यांमधून सातत्याने नव्या अपडेट्स समोर येत आहेत. अशा परिस्थितीत आता दरामध्ये सकारात्मक बदल पाहायला मिळत आहेत. सोयाबीन बाजारात सध्या दरांमध्ये मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहे. नव्या हंगामातील आवक वाढत असताना काही बाजार समित्यांमध्ये दर वाढताना दिसत आहेत, तर काही ठिकाणी घसरण नोंदली जात आहे. मात्र एकुणच राज्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या दरामध्ये चांगली सुधारणा पाहायला मिळत आहे.
सोयाबीनचे सध्याचे बाजारभाव काय ?
एकूणच सोयाबीनचे सर्वसाधारण दर 4,000 ते 4,450 रुपये प्रतिक्विंटल या पातळीवर स्थिरावलेले दिसतात. अहिल्यानगर बाजार समितीत 68 क्विंटल आवक झाली असून येथे किमान 4,100 तर कमाल 4,600 रुपये दर मिळाला. सर्वसाधारण भाव 4,350 रुपये राहिला. येवला बाजारात कमी आवक असूनही भाव तुलनेने स्थिर राहिले. येथे 4,276 ते 4,390 रुपये दर नोंदवले गेले. लासलगाव आणि लासलगाव-विंचूर या महत्त्वाच्या बाजारांत मोठी आवक झाली. लासलगावमध्ये 663 क्विंटल तर विंचूरमध्ये 411 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. येथे कमाल दर 4,600 रुपयांपर्यंत पोहोचले.
मराठवाडा विभागात माजलगाव, जालना, लातूर-मुरुड, जिंतूर, लोणार यांसारख्या बाजारांत मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक झाली. जालना बाजारात तब्बल 5,420 क्विंटल आवक झाली असून येथे कमाल दर 5,300 रुपये इतका उच्चांकी राहिला. त्यामुळे जालना हा आजचा सर्वाधिक दर देणारा बाजार ठरला. तर माजलगावमध्ये 692 क्विंटल आवक असून सरासरी भाव 4,350 रुपये नोंदवला गेला.
विदर्भात सोयाबीनला समाधानकारक दर
विदर्भातील कारंजा, अमरावती, अकोला, यवतमाळ, खामगाव, मुर्तीजापूर आणि हिंगणघाट या बाजारांत सोयाबीनची मोठी उलाढाल झाली. कारंजा बाजारात तब्बल 7,000 क्विंटल आवक झाली असून सर्वसाधारण दर 4,295 रुपये राहिला. खामगाव बाजारात 6,525 क्विंटल आवक झाली आणि येथे कमाल दर 5,200 रुपये मिळाला. अकोला व यवतमाळ या बाजारांत पिवळ्या सोयाबीनला 4,800 रुपयांपर्यंत भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला.
एकूणच पाहता, राज्यात सोयाबीनचे दर सध्या मध्यम पातळीवर टिकून आहेत. चांगल्या प्रतीच्या पिवळ्या सोयाबीनला काही बाजारांत 4,500 ते 5,300 रुपये इतका भाव मिळत आहे, तर कमी दर्जाच्या मालाला 3,000 ते 3,800 रुपये दर मिळत आहेत. त्यामुळे एकूणच राज्यभरात सध्या सोयाबीनच्या दरात किंचित सुधारणा दिसत आहे. विदर्भातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा सध्या मिळताना दिसत आहे.





