मुंबई- शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मटण खाण्यावरुन केलेलं वक्तव्य राजकारणाचा विषय ठरतंय. भाजपा, शरद पवार राष्ट्रवादी आण ठाकरेंची शिवसेना यांच्यात या विषयावरुन जोरदार टोलेबाजी सुरु आहे.
मी मटण खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी जाहीरपणे केल्यानंतर भाजपा नेत्यांनी यावर टीका केली आहे.
नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
एका कार्यक्रमात सु्प्रिया सुळे यांनी याबाबत भाष्य केले होते. त्या म्हणाल्या की मी रामकृष्ण हरीवाली आहे. फक्त माळ घालत नाही. कधी कधी मटण खाते, मी त्यांच्यासारखं खोटं बोलत नाही. मटण खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. माझे आई वडील, सासू सारे, नवरा खातो. आमच्या पैशांनी आम्ही खातो, आम्ही कुणाला मिंधे नाही. खाते तर खाते, खाल्ले तर काय पाप केले का? असा सवालही सुप्रिया सुळेंनी केलाय.
भाजपाचं सुप्रिया सुळेंच्या विधानावर टीकास्त्र
सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी काही बोलणार नाही, वारकरी समाजच यावर उत्तर देईल. तर मंत्री नितेश राणे यांनी हीच हिंदू समाजाची विशालता असल्याचं म्हटलंय. कुणी मटण खावे यावर कुणाचीही बंदी नाही. त्या सातही दिवस मटण खात असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण पांडुरंगाला चालतं असं सांगून त्या कुणाला खूश करण्याचा प्रयत्न करतायेत असा सवाल त्यांन केलाय.
राऊत विरुद्ध बन असाही संघर्ष
कुणी काय खावं हे ज्यांचं त्यांनी ठरवायचं आहे. फडणवीस काय शाकाहारी आहेत का, असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारलाय. तर राऊतांच्या वक्तव्यावर भाजपा प्रवक्ते नवनाथ बन यांनी टीका केली आहे. कुणी काय खावं हा ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे मात्र संजय राऊत शेण खातात का, असा सवाल बन यांनी उपस्थित केलाय.





