मुंबई – शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुएळ यांना आज मराठी आंदोलकांच्या नाराजीचा सामना करावा लागला. सुप्रिया सुळे यांनी आझाद मैदानावर जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीनंतर परतत असताना त्यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातला.
मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी करत सुप्रिया सुळे यांच्या गाडीवर बाटल्याही फेकल्या. शरद पवार यांच्यामुळे मराठ्यांचं वाट्टोळं झालं, असंही काही आंदोलक म्हणत होते. या घटनेचे राजकीय वर्तुळात मोठे पडसाद उमटले आहेत. शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मात्र याबाबत संयमित प्रतिक्रिया दिल्यात.

सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांवर शरसंधान
मनोज जरांगे यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरसंधान केलंय. फडणवीस जेव्हा विरोधी पक्षात होते, तेव्हा सत्तेत आल्यानंतर मराठ्यांना आरक्षण देणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मग आता ते निर्णय का घेत नाहीत, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे. 11 वर्ष सत्तेत आहात तर मराठा आरक्षण देऊन दाखवा, असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात.
अधिवेशन बोलावून आरक्षण द्या- सुप्रिया सुळे
मनोज जरांगे पाटील यांची मागणी सगळ्याच राजकीय पक्षांना मान्य आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. आवश्यकता असेल तर एका दिवसाचे अधिवेशन बोलवून हा प्रश्न मार्गी लावावा, असं आवाहनही सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
मनोज जरांगे यांच्या प्रकृतीबाबत चिंता
मनोज जरांगे यांनी गेल्या 4 दिवसांपासून पोटात अन्न घेतलेले नाही त्यामुळं त्यांची तब्येत खराब झाली असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. उद्यापासून जरांगे यांनी पाणी सोडण्याचाही इशारा दिलाय. त्यामुळं सरकारनं यावर तातडीनं तोडगा काढण्याची गरज सुळे यांनी व्यक्त केली आहे.











