पुण्यात उद्योजकाच्या बंगल्यात घुसून पैसे लुटले; पोलिसांनी 1,200 किलोमीटर फिल्मी स्टाईल पाठलाग केला, आरोपी अटकेत

सहा लाखांचा ऐवज लुटून नेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाला यश आले आहे. पुणे ते राजस्थान असा आरोपींचा पाठलाग पोलिसांनी केला.

निगडीतील वृद्ध उद्योजकाच्या बंगल्यात घुसून वृद्धाचे हातपाय बांधून, पिस्तुलाचा धाक दाखवून सहा लाखांचा ऐवज लुटून नेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाला यश आले आहे. या टोळीतील मुख्य आरोपींचा राजस्थानपर्यंत तब्बल 1200 किलोमीटर पाठलाग करून पोलिसांनी त्याला जेरबंद केले. पोलीसांच्या या कृतीचे कौतुक केले जात आहे. तर या प्रकरणी पोलिसांकडून आणखी एका आरोपीला पुणे येथून अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

आरोपी शेर तर पोलीस सव्वाशेर

गुन्हा केल्यानंतर मोबाइल लोकेशन ट्रेस होऊ नये म्हणून आरोपींनी मोबाइलऐवजी वॉकी टॉकीचा वापर केल्याचे निष्पन्न झाले. सुरेश लादुराम ढाका, वय 29, रा. दंतीवास, जि. जलौर, राजस्थान, आणि महिपाल रामलाल विष्णोई, वय 19, सध्या रा. वडगाव मावळ, अशी अटक आरोपींची नावे आहेत. 19 जुलै रोजी सायंकाळी चंद्रभान अगरवाल, वय 76, या वृद्ध उद्योजकाच्या बंगल्यात घुसून पाच दरोडेखोरांनी त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून हातपाय बांधले आणि घरातील कपाटामधील सोन्या-चांदीचे दागिने, महागडी घड्याळे असा तब्बल सहा लाख 15 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला होता.

1,200 किमीचा पाठलाग !

राजस्थानकडे पळून जाताना या दरोडेखोरांनी बंगल्यालगतच्या खोलीत राहणाऱ्या रखवालदारासह त्याची पत्नी व दोन मुलांनाही हातपाय बांधून खोलीत कोंडले.त्यानंतर ते पसार झाले. या दरोड्याने शहरात खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आले. या पथकाने सुमारे 1200 किलोमीटर प्रवास केला;  आणि आरोपींना ताब्यात घेतले.

या घटनेनंतर नागरिकांत मात्र काहीसे भीतीचे वातावरण सध्या पाहायला मिळत आहे. कारण, अशा प्रकारच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. पोलिसांकडून नागरिकांना मात्र सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News