ओबीसींच्या हक्कासाठी छगन भुजबळ मैदानात, मुंबईत सोमवारी निर्णायक बैठक

निर्णायक लढाईसाठी जरांगे पाटील मुंबईत उपोषणाला बसले आहेत. याला ओबीसी नेत्यांनी विरोध केल्यास हा संघर्ष येत्या काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

मुंबई- मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या चांगलाच पेटला असताना, ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आता थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजासाठी ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करत असलेले मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, ओबीसी समाजात अस्वस्थता पसरलेली आहे.

याच पार्श्वभूमीवर, छगन भुजबळ यांनी उद्या (दिनांक १ सप्टेंबर) रोजी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी समता परिषदेसह राज्यभरातील ओबीसी नेते आणि संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

बैठकीला कोण कोण राहणार उपस्थित?

या बैठकीसाठी आ.गोपीचंद पडळकर,आमदार पंकज भुजबळ,समीर भुजबळ, प्रकाश शेंडगे, बबनराव तायवाडे, ॲड.मंगेश ससाने, प्रा.लक्ष्मण हाके,ॲड.मृणाल ढोलेपाटील, नवनाथ वाघमारे यांच्यासह अनेक ओबीसी संघटनांचे नेते उपस्थित राहणार आहेत.

बैठकीत काय होणार?

बैठकीमध्ये ओबीसी समाजाची पुढील भूमिका, मराठा आरक्षणासंदर्भातील सरकारची भूमिका, आणि जरांगे यांच्या मागण्यांवर ओबीसी समाजाची स्पष्ट भूमिका ठरवली जाणार आहे.

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास अनेकांचा विरोध

महाराष्ट्राच्या लोकसंख्येचा विचार केला तर राज्यात मराठा समाजाची लोकसंख्या ही 35 टक्के आहे. तर ओबीसींची संख्याही 35 टक्क्यांच्या घरात आहे. ओबीसींना 27 टक्क्यांच्या जवळपास आरक्षण असलं तरी 300 च्यावर जाती ओबीसींमध्ये येतात. ओबीसींमध्येच काही जातींना आरक्षण योग्य मिळत नसल्याच्या कुरबुरी असताना आता मराठा समाजाला ओबीसींतून आरक्षण दिल्यास आरक्षणाची स्पर्धा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ओबीसी नेते आणि संघटना यांचा मराठा समाजाला ओबीसींतून आरक्षण देण्यास विरोध आहे.

ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष निर्माण होणार?

मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केल्यानंतर, गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष तीव्र झालेला आहे. आता निर्णायक लढाईसाठी जरांगे पाटील मुंबईत उपोषणाला बसले आहेत. याला ओबीसी नेत्यांनी विरोध केल्यास हा संघर्ष येत्या काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.


About Author

Smita Gangurde

Other Latest News