महाराष्ट्राच्या कविविश्वात विनोदी काव्यसादरीकरणाची वेगळी ओळख निर्माण करणारे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट आणि ‘मिर्झा एक्सप्रेस’ फेम डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे आज शुक्रवार, 28 नोव्हेंबर सकाळी 6.30 वाजता अमरावती येथे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 68 वर्षांचे होते.गेल्या काही महिन्यांपासून ते मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते आणि अमरावतीत त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या साहित्यविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हास्यसम्राट हरपला; साहित्यविश्वात हळहळ
सुप्रसिद्ध मराठी कवी आणि हास्यसम्राट म्हणून ओळखले जाणारे डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे आज शुक्रवार, २८ नोव्हेंबर रोजी अमरावती येथे निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. ते दीर्घकाळापासून मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. तसेच त्यांच्यावर अमरावतीत उपचार सुरू होते. डॉ. मिर्झा रफी अहमद बेग हे ‘मिर्झा एक्सप्रेस’ या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय होते. त्यांनी आपल्या खुमासदार नर्मविनोदी शैलीमुळे मराठी कवी संमेलनांमध्ये हास्यसम्राट म्हणून विशेष स्थान मिळवले होते. तसेच त्यांचे २० हून अधिक काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. त्यांचा ‘मिर्झाजी कहीन’ हा वर्तमानपत्रातील स्तंभही खूप लोकप्रिय होता.

साहित्य आणि कलाविश्वात मोठे योगदान
महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात नेर तालुक्यातील धनज माणिकवाडा हे त्यांचे मूळ गाव असून ते अमरावती येथे नवसारी परिसरात ‘मिर्झा एक्सप्रेस’ नावाच्या घरात वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि दोन मुलीअसा परिवार आहे. त्यांच्या निधनाने विदर्भ आणि संपूर्ण मराठी साहित्य तसेच कवी संमेलन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. महाराष्ट्राच्या काव्य आणि साहित्यविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्यावर आज दुपारी अमरावती येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
डॉ. मिर्झा रफी अहमद बेग हे महाराष्ट्रात आणि विशेषत: विदर्भ-मराठवाडा परिसरात कविसंमेलनांचे आकर्षणबिंदू होते. त्यांच्या नावाने प्रसिध्द असलेली ‘मिर्झा एक्सप्रेस’ काव्यमैफल अतिशय लोकप्रिय होती. त्यांनी 6 हजारांहून अधिक काव्य सादरीकरणे केली. त्यांच्या नावावर 20 काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. ते विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देखील राहिले होते.