काही डॉक्टर रूग्णांची मनोभावे सेवा करतात, तर काही डॉक्टर अत्यंत निष्ठूर आणि बेजबाबदारपणे वागल्याच्या घटनाही समोर येत असतात. यवतमाळमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रूग्णाला न तपासता मृत घोषित केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा उपजिल्हा रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात असून डॉक्टरावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
मद्यधुंद डॉक्टरचा भयावह कारनामा
ज्या डॉक्टरांनी जीवंत रुग्णाला मृत घोषित केले त्या डॉक्टरांनी मद्यसेवन केल्याचा आरोप करण्यात येत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात असलेल्या शासकीय रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. दारव्हा तालुक्यातील गोरेगाव येथील रुग्णाला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांनी कोणत्याही प्रकारची तपासणी न करता रुग्णाचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं. इतकेच नाही तर मृत जाहीर केल्यावर पेपरही तयार करण्यात आले आणि शवविच्छेदनाची तयारी सुरू झाली. ज्या रुग्णाला मृत घोषित केले त्याला शवविछ्चेदनासाठी नेण्याच्या हालचाली सुरू केल्या.

मात्र, संशय आल्याने रुग्णाच्या नातेवाईकांना आक्षेप घेतला. शिवाय डॉक्टरांच्या हालचालीवर संशय आला आणि त्यानंतर त्यांना डॉक्टर हे दारू पिऊन ड्युटीवर उपस्थित असल्याचं लक्षात आले. यानंतर नातेवाईकांनी रुग्णाची पुन्हा तपासणी करण्यास सांगितले. यावेळी रुग्ण जीवंत असल्याचं आढळून आले. यानंतर डॉक्टरांनी तातडीने डेथ मेमो फाडून टाकला आणि रुग्णाचे रेफर पेपर तयार केले. या घटनेबाबत उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राजेश मनवर यांना मिळाली असता त्यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली. यावेळी त्यांनी संबंधित डॉक्टरांना नोटीस बजावली.
संबंधित डॉक्टरवर कारवाईची मागणी
या प्रकरणात संबंधित डॉक्टरवर कठोर कारवाई करण्याची मागणी रुग्णाच्या नातेवाईकांनी केली आहे. या प्रकरणावर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राजेश मनवर यांनी सांगितले की, घडलेल्या प्रकाराबाबत संबंधित डॉक्टर यांना मेमो देण्यात आला आहे. त्यांनी मद्य प्राशन केल्याचं लक्षात आलं आहे. तसेच रुग्णाला मृत घोषित केलं. या प्रकरणात त्यांना विचारणा करण्यात आली आहे. या प्रकरणी संबंधित डॉक्टरची हकालपट्टी केली जाण्याची शक्यता आहे.











