MP Breaking News
Sat, Dec 13, 2025

स्वत:चे पैसे खर्च करुन दरवर्षी ‘तो’ करतोय बाप्पावर पुष्पवृष्टी, कोण आहे सुगंधी फुलांची उधळण करणारा अवलिया

Written by:Astha Sutar
मी माझ्या वार्षिक कमाईतील थोडा वाटा बाप्पाच्या सेवेसाठी बाजूला काढतो. मी दरवर्षी साधारण अडीच लाख रुपये बाप्पाच्या सेवेसाठी बाजूला काढून ठेवतो, आणि शेवटी बाप्पाची सेवा हिच ईश्वरी सेवा आहे.

Ganesh Immersion 2025 : गेल्या 10 दिवसांपासून लाडके गणपती बाप्पा विराजमान होते. पण आज (शनिवारी) मुंबईसह महाराष्ट्रात बाप्पांचे विसर्जन होत आहे. सार्वजनिक गणेश मंडळातील गणपती हे ढोलताशा, डिजे, लेझिम पथकाच्या तालावर वाजत-गाजत मिरवणूक काढत चौपाट्यांवर विसर्जन केले जाते. दरम्यान, मुंबईचा राजा, लालबागचा राजा तेजुकाया गणपती यांना श्रॉफ बिल्डिंग येथे गणपतीवर पुष्पवृष्टी करण्यात येते. मात्र मुंबईतील बकरी अड्डा येथे पदरमोड करुन गेल्या कित्येक वर्षापासून एक अवलिया सार्वजनिक गणपती बाप्पावर भक्तिमय आणि उत्साहाच्या वातावरणात रंगीबेरंगी ‘फुलांची सुगंधी उधळण’ करत आहे. विनायक नेवगे असं या अवलियाचे नाव आहे.

बाप्पाची सेवा हीच ईश्वरी भक्ती

दरम्यान, अनेक मंडळ किंवा तिथले कार्यकर्ते हे मंडळाच्या पैशातून किंवा वर्गणीच्या माध्यमातून कार्य किंवा पुष्पवृष्टी करतात. पण विनायक नेवगे हे गेल्या कित्येक वर्षापासून स्वत:चे पैसे खर्च करुन बकरी अड्डा येथे प्रत्येक सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतीवर ‘फुलांची सुगंधी उधळण’ करताहेत. मी माझ्या वार्षिक कमाईतील ठराविक रक्कम बाजूला काढून विसर्जनासाठी जाणाऱ्या प्रत्येक गणपतीवर पुषवृष्टी करण्यास सुरुवात केली. आजही मी माझ्या वार्षिक कमाईतील थोडा वाटा बाप्पाच्या सेवेसाठी बाजूला काढतो. मी दरवर्षी साधारण अडीच लाख रुपये बाप्पाच्या सेवेसाठी बाजूला काढून ठेवतो”, आणि शेवटी बाप्पाची सेवा हिच ईश्वरी सेवा असल्याचे विनायक नेवगे यांनी सांगितले.

किती किलो लागतात फुलं?

दुसरीकडे विनायक नेवगे हे गिरगाव चौपाटीच्या दिशेने जाणाऱ्या सर्व गणपतीवर पुष्पवृष्टी करताहेत. यामध्ये लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, तेजुकाया गणपती, मुंबईचा राजा आदी गणपतीसह अनेक मोठ्या आणि मानाच्या गणपतींचा समावेश असतो. या पुष्पवृष्टीसाठी फुलांची अगोदर ऑर्डर द्यावी लागते. तसेच दरवर्षी विविध रंगीबेरंगी साधारण तीनशे ते साडेतीनशे किलो फुलांची गरज असल्याची माहिती विनायक नेवगे यांनी दिली. दुसरीकडे ही बाप्पाची सेवा करत असताना आता विनायक नेवगे यांनी त्यांची ‘मैत्री फाउंडेशन’ या नावाने सामाजिक संस्था सुरू केली आहे.

या संस्थेतर्फे समाजपयोगी उपक्रम राबवत असतात. दरवर्षी विनायक नेवगे हे हिरारीने गणपती बाप्पावर पुष्पवृष्टी करताहेत. त्यामुळं आता हे माझं काम बघून अनेकजण माझ्या कार्यासोबत आले आहेत. विसर्जण दरम्यान, प्रत्येकजण आपल्या सोईनुसर, वेळेनुसार मला मदत करत असतो.