राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि चाळीसगाव विधानसभेचे माजी आमदार राजीव देशमुख यांचं आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्यांने निधन झालं. त्यांच्या निधनाने चाळीसगावच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून, सर्वत्र शोककळा पसरली आहे. ऐन दिवाळीच्या दिवशीच देशमुखांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
राजीव देशमुखांची लक्षवेधी कारकीर्द
राजीव देशमुख यांनी 2009 ते 2014 या कालावधीत चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते. आमदारकीच्या काळात त्यांनी चाळीसगाव आणि परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवले. त्याआधी चाळीसगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले होते. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) प्रदेश नेतृत्वात उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते.
2014 आणि 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला होता. मात्र, कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा प्रभाव कायम होता. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, विशेषतः लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी, महाविकास आघाडीकडून राजू देशमुख यांच्या नावाची चर्चा सुरू होती. पक्षात त्यांचा अनुभव, जनसंपर्क आणि प्रशासकीय जाण लक्षात घेता, त्यांना जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती.
स्थानिक राजकारणात चांगली पकड
स्थानिक राजकारणात पकड असलेले आणि सर्वसामान्य जनतेत मिसळून काम करणारे नेते म्हणून राजीव देशमुख यांची प्रतिमा होती. त्यांच्या निधनाची बातमी कळताच, त्यांच्या चाहत्यांना आणि कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. चाळीसगावच्या राजकारणातील एक महत्त्वाचा आधारस्तंभ गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
विविध पक्षातील नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या जाण्याने केवळ राष्ट्रवादी पक्षालाच नव्हे, तर चाळीसगावच्या सर्वपक्षीय राजकारणाने एक अनुभवी, संयमी आणि दूरदृष्टी असलेला नेतृत्वकर्ता गमावला आहे. त्यांचं स्थान तातडीनं भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.





