सोलापूरात माजी महापौराकडून महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल

माजी महापौराने लॉजमध्ये एका महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत महिलेने व्हिडिओ काढत संबंधिताचं स्टींग ऑपरेशन केलं...

सोलापुरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी महापौराने लॉजमध्ये एका महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत महिलेने व्हिडिओ काढत संबंधिताचं स्टींग ऑपरेशन केलं आहे. सबळ पुराव्यांमुळे पोलिसांनी देखील या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर येत आहे.

महिलेसमोर अश्लील कृत्य 

पीडित व तक्रारदार महिला पुणे येथे वास्तव्यास आहे. सोलापूर जिल्ह्यातील एका गावात त्यांचा शेतीच्या वादामुळे न्यायालयीन खटला सुरू आहे. न्यायालयीन कामासाठी पीडित महिला सोलापुरात वकिलांना भेटण्यासाठी येत असतात. 14 जूनला पीडित महिला माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या मालकीच्या शिवपार्वती लॉजमध्ये राहिल्या होत्या.

मनोहर सपाटे याने 16 जूनच्या मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास याने लॉजमधील रूमचा दरवाजा ठोठावून महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पीडित महिलेशी अश्लील हावभाव करीत विनयभंग केला. पीडित महिलेनं घाबरून ‘तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात, असे का करता?’ असं विचारलं. तेव्हा आरोपीनं अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत तू कुठेही तक्रार केली, तरीही मला काही फरक पडत नाही. कारण माझे वय जास्त असल्यामुळे मला जामीन मिळतो, असे सांगत दमदाटी केली.

पुराव्यांचा आधारावर गुन्हा दाखल

पीडितेनं स्टिंग ऑपरेशन करण्याचं ठरवलं. 24 जूनला संध्याकाळी पीडितेनं रूम नं. 307 मध्ये जाऊन सपाटेंच्या कृत्याचे व्हिडिओ काढले. त्या व्हिडिओत सपाटे हा पीडितेसोबत अश्लील कृत्य करताना दिसून येत आहे. या व्हिडिओतील पुराव्याच्या आधारे 25 जूनला फौजदार चावडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. त्यानुसार सपाटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस सध्या या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.


About Author

Rohit Shinde

Other Latest News