लोकप्रतिनिधींकडून मतदारसंघांमध्ये शासकीय निधीची अफरातफर झाल्याच्या अनेक घटना आजवर समोर आल्या आहेत. अनेक आरोप देखील सातत्याने होत असतात. अशीच एक घटना सांगली जिल्ह्यातून सांगोला मतदारसंघातून समोर आली आहे. भाजपाच्या पदाधिकाऱ्याने माजी आमदार दिपक साळुंखे आणि त्यांच्या कुटुंबियांवर कोट्यवधींच्या निधीची अफरातफर केल्याचे आरोप केले आहेत.
माजी आमदारावर निधीच्या अफरातफरीचे आरोप
सांगोला-पंढरपूर परिसरातील बंद पडलेल्या पद्मभूषण वसंतदादा पाटील सहकारी सुतगिरणी तसेच विद्याविकास मंडळ संस्थांमधील तब्बल कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारांबाबत चौकशीची मागणी भाजपने केली आहे. माजी आमदार दिपक आबा साळुंखे-पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी करा, अशी जोरदार मागणी भाजपचे पदाधिकारी श्रीकांत देशमुख यांनी केली आहे. सोलापूर ग्रामीण पोलिसांसह विविध यंत्रणांकडे सुमारे 800 हून अधिक पानांचे पुरावे जोडूनही राजकीय हस्तक्षेपामुळे साळुंखेंवर कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त केली.
नेमका घोटाळ्याचा आरोप आहे तरी काय ?
पद्मभूषण वसंतदादा पाटील सहकारी सुतगिरणी, जवळा येथील विद्याविकास मंडळ तसेच बळीराजा फलोत्पादक संघ आदींवर कार्यरत आहेत. या संस्थांमध्ये शासकीय निधीचा अपहार, अवैध जमिनी व्यवहार, बँक फसवणूक आणि धर्मादाय कायद्याचे उल्लंघन केले आहे. 93 लाखांचा भूसंपादन मोबदला बोगस संचालक मंडळाने सांगोला शाखेतील महाराष्ट्र बँकेत खोट्या ठरावावरून जमा करून लंपास केला, असा देशमुख यांचा आरोप आहे. त्यामुळे आता आगामी काळात या प्रकरणात नेमकी काय कारवाई होते, ते पाहणे या निमित्ताने महत्वाचे ठरणार आहे.





