मुसळधार पावसामुळे दोन दिवसांत राज्यात अनेकांनी गमावला जीव! धक्कादायक आकडे समोर

दोन दिवसांत महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांनी जीव गमावला आहे, तर 11 जण जखमी झाले आहेत. काही प्राण्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे.

राज्यात सध्या पावसाची संततधार सुरू आहे. मान्सूनपूर्व पाऊस आणि वीजांमुळे राज्यात गेल्या 48 तासांत अनेकांनी जीव गमावला आहे. दोन दिवसांत 23 ते 24 जणांचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी झालेत. पावसाचा फटका जनावरांनाही बसला असून आत्तापर्यंत 55 प्राण्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अनेकांनी जीव गमावला, कित्येक जखमी

पावसामुळे झालेल्या जीवितहानीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोमवारी मुसळधार पावसामुळे 10 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये पाच जणांचा वीज कोसळल्याने, तर पाच जणांनी पाण्यात बुडून जीव गमावला. तर त्याच त्याच दिवशी 11 जण जखमी झाले. त्यापैकी पाच नागरिक हे वीज कोसळल्याने, चार जण झाड कोसळल्याने जखमी झाले तर दोघे जण पाण्यात बुडून जखमी झाले. याशिवाय, विजेमुळे 55 छोट्या प्राण्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी आणखी 14 मृत्यू नोंदवले गेले, यामध्ये चार जणांचा वीज कोसळल्याने, एकाचा पाण्यात बुडून आणि दोघांचा झाड कोसळल्याने मृत्यू झाला. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पावसाचा जोर कायम राहणार

महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसानं दमदार हजेरी लावली आहे, राज्याला अवकाळीचा चांगलाच तडाखा बसला असून, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. विशेषत: बागायती क्षेत्राचं मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे. राज्यातील हा पावसाचा जोर पुढील आणखी तीन ते चार दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस कायम राहिल, असा अंदाज आहे.

मुंबईसह विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यलो अलर्ट जारी करण्यात आलेल्या जिल्ह्यांच्या यादीत मुंबई, रायगड, पालघर, ठाणे, धुळे, पुणे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, सातारा, हिंगोली, सांगली, जालना, परभणी, भंडारा, बुलढाणा, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, गडचिरोली,वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर , कोल्हापूर, सोलापूर, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अशी घ्या काळजी

उन्हाळ्यात कोसळणाऱ्या अवकाळी अथवा पूर्वमोसमी पावसात वीजांचे प्रमाण अधिक असते. अशावेळी वीजांचा लखलखाट सुरू असताना शक्यतो घरातून अथवा कार्यालयातून बाहेर पडू नका. शेतीच्या कामांना घाई करू नका. या काळात वीज कोसळल्याने जीव गमावावा लागू शकतो. शिवाय पुराच्या पाण्यात जाणे अथवा वाहन चालवणे टाळावे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News