महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासूनच पावसाचा जोर चांगलाच वाढताना दिसत आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. दक्षिण महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये तीव्र पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने पावसाचा हा जोर आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाचा अंदाज सविस्तरपणे जाणून घेऊ…
मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये ढगाळ हवामान असून हलक्या ते मध्यम दर्जाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईतील जास्तीत जास्त तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान अंदाजे 26 अंश सेल्सिअस राहू शकते. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान विभागाने पिवळा इशारा जारी केला आहे, तर ठाणे, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाडा-विदर्भात पावसाचा जोर वाढणार!
मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने पिवळा इशारा जाहीर केला आहे. जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हे वगळता लातूर, धाराशिव, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड यांना हा यलो अलर्ट दिला गेला आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने पिवळा इशारा जाहीर केला आहे. पुढील काही दिवस राज्यात पावसाचा सतत प्रभाव राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मोठा पाऊस झाल्यानंतर विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या चार जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने पिवळा इशारा जाहीर केला आहे. तर पुणे परिसरात ढगाळ वातावरण असून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
देशातील 11 राज्यांत पावसाचा जोर वाढणार!
गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक भागांमध्ये मान्सूनचा जोर काहीसा मंदावलेला दिसत आहे. पावसाची तीव्रता कमी झाल्यामुळे काही ठिकाणी उष्णतेची चाहूल लागली आहे. मात्र, पुढील आठवड्यात हवामानात मोठा बदल होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. स्कायमेट वेदरच्या अहवालानुसार, सोमवारपासून देशभरातील 11 राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रातही या पावसाचा मोठा प्रभाव दिसू शकतो. त्यामुळे महाराष्ट्रासाठी आगामी काही दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.