CM Devendra Fadnavis : राज्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये गुंतवणूकदार आणि उद्योग क्षेत्राचा मोठा वाटा आहे. यासाठी राज्यातील विविध ठिकाणी उद्योग, माहिती तंत्रज्ञान, अन्नप्रक्रिया उद्योग, गोदामे, डेटा सेंटर आणि लॉजिस्टिक हब प्रकल्प उभारणीसाठी 1,08,599 कोटी गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार करण्यात आले असून, याद्वारे 47 हजार रोजगार निर्मिती होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या सामंजस्य करारांचे आदान प्रदान करण्यात आले.
यावेळी एमजीएसए रिअॅलिटी अध्यक्ष अमरप्रकाश अग्रवाल, लोढा डेव्हलपर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अभिषेक लोढा, रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे केतन मोदी, अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडचे अध्यक्ष अजित बरोदिया आणि पॉलीप्लेकस कार्पोरेशन लिमिटेडचे प्रणय कोठारी आदी उपस्थित होते.

कुठल्या प्रकल्पासाठी किती गुंतवणूक?
– औद्योगिक गोदामे, डेटा सेंटर आणि लॉजिस्टिक हब उभारणीसाठी एमजीएसए रिअॅलिटी यांच्या वतीने 5 हजार कोटीची गुंतवणूक, यातून 10 हजार रोजगार निर्मिती
– ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे ‘ ग्रीन इंटिग्रेटेड डेटा सेंटर पार्क’ उभारणीसाठी लोढा डेव्हलपर्स लिमिटेडकडून 30 हजार कोटी रुपये गुंतवणूक, 6 रोजगार निर्मिती
– नागपूर येथे एकात्मिक कोळसा सरफेस वायूकरण डाउनस्ट्रीम डेरिव्हेटिव्ह्ज प्रकल्पासाठी अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडकडून 70 हजार कोटी रुपये गुंतवणूक, 30 रोजगार निर्मिती
– नंदुरबार येथे पॉलिमेरिक उत्पादनांचा प्रकल्पासाठी पॉलीप्लेकस कार्पोरेशन लिमिटेड यांच्याकडून २ हजार ८६ कोटी रुपये गुंतवणूक गुंतवणूक, 600 लोंकाना रोजगार निर्मिती
– काटोल, नागपूर येथे रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड यांच्याकडून १ हजार ५१३ कोटी रुपये गुंतवणूक, 500 जणांना रोजगार निर्मिती
‘इज ऑफ लिव्हिंग’साठी शासनाचा पुढाकार…
दरम्यान, आता राज्य सरकार जास्तीत जास्त सेवा लोकांना डिजिटलच्या माध्यमातून पुरवणार आहे. यासाठी सरकार ‘आपले सरकार 2.0’ पोर्टल कार्यान्वित करणार आहे. नागरिकांना तंत्रज्ञानाचा उपयोग करीत जास्तीत जास्त सुलभ पद्धतीने योजनांचे लाभ आणि सेवा देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. शासनाच्या संपूर्ण सेवा आणि योजनांचे लाभ एकाच आपले सरकार पोर्टलवरून देण्यात यावेत. आज समग्र संस्थेसोबत ‘गव्हर्नन्स प्रोसेस री इंजीनियरिंग’ बाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.











