MP Breaking News
Sat, Dec 13, 2025

मुंबईत रविवारी मध्य आणि हार्बर दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवाशांना वेळापत्रक पाहून प्रवास करण्याचे आवाहन

Written by:Rohit Shinde
मुंबई लोकलच्या हार्बर आणि मध्य मार्गांवर महत्त्वाचे ब्लॉक लागू करण्यात आले आहेत. प्रवाशांनी प्रवासाची आखणी करताना सुधारित वेळापत्रकाचा विचार करावा. त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

उद्या रविवारी, 23 नोव्हेंबर रोजी देखील मुंबईत मेगाब्लॉक असणार आहे. रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरांतील प्रवाशांना काहीसा त्रास सहन करावा लागणार आहे. मुंबई लोकल ही शहराची जीवनरेखा मानली जाते. परंतु रविवारी होणाऱ्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. रेल्वेच्या देखभाल आणि दुरुस्ती कामांसाठी हा मेगाब्लॉक आवश्यक असला तरी त्यामुळे अनेक गाड्या उशिरा धावतात किंवा रद्द होतात. प्रवाशांना लांब रांगा, गर्दी, उशीर आणि असुविधा यांचा सामना करावा लागतो. अनेक वेळा पर्यायी प्रवास व्यवस्था नसल्याने कामावर जाणारे आणि प्रवास करणारे लोक अडचणीत सापडतात.

हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक नियोजन

शनिवारी रात्री हार्बर मार्गावर मोठा ब्लॉक घेण्यात येत आहे. पनवेल स्थानक परिसरात सुरू असलेल्या अभियांत्रिकी आणि पायाभूत सुविधांच्या कामांसाठी हा 12 तासांचा ब्लॉक ठेवण्यात आला आहे. त्यामुळे अनेक लोकल सेवांवर परिणाम होणार असून प्रवाशांनी प्रवासाची योजना आखताना या बदलांचा विचार करणे गरजेचे आहे. शनिवारी रात्री 11.45 वाजल्यापासून ते रविवारी सकाळी 11.45 वाजेपर्यंत हा ब्लॉक लागू असेल. पनवेल स्टेशनच्या फलाट क्रमांक 2 वर सुरू असलेल्या कामांमुळे बेलापूर–पनवेल दरम्यान लोकल सेवा बंद राहतील. तसेच पनवेलकडे जाणाऱ्या बेलापूर, नेरुळ, वाशी आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील काही गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. या कालावधीत सीएसएमटी–पनवेल आणि सीएसएमटी–वडाळा लोकल सेवाही उपलब्ध राहणार नाहीत. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना पर्यायी मार्गांचा विचार करून प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ट्रेनचे सुधारीत वेळापत्रक

  • शनिवारी रात्रीची 10.50 वाजताची सीएसएमटी–पनवेल लोकल बेलापूरपर्यंतच धावेल.
  • तर 10.55 ची ठाणे–पनवेल लोकल पूर्णपणे रद्द असेल.
  • रविवारी सकाळी 9.28 आणि 11.28 वाजताची पनवेल–सीएसएमटी लोकल वाशीवरून सुटणार आहे.
  • तसेच 11.52 वाजताची पनवेल–सीएसएमटी लोकल बेलापूरवरून प्रस्थान करेल.
  • रविवारी ठाणे–पनवेल, ठाणे–नेरुळ आणि ठाणे–वाशी या मार्गांवरील काही लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
  • त्याचप्रमाणे पनवेल–ठाणे दिशेतील अनेक सकाळचे फेऱ्या रद्द राहतील.

मध्य रेल्वे मार्गावरील ब्लॉकचे नियोजन

मध्य रेल्वेवरील बदलापूर परिसरात उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी सलग 12 दिवसांचा रात्रीचा ब्लॉक लागू करण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे प्रवाशांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून रात्री 12.12 वाजता सुटणारी कर्जत लोकल आता केवळ अंबरनाथपर्यंत धावणार आहे. तसेच रात्री 2.30 वाजता कर्जत येथून सुटणारी लोकल पुढील 12 दिवस अंबरनाथ स्टेशनवरून सुरू होईल. या बदलांचा परिणाम कर्जत, भिवपुरी, नेरुळ, शेलू, वांगणी आणि बदलापूर या स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांवर होणार आहे. 3 डिसेंबरपर्यंत चालणार्‍या या ब्लॉकमुळे केवळ लोकल सेवाच नव्हे तर लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

वेळापत्रक पाहून प्रवास करा!

या मेगाब्लॉकच्या काळात प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा, असे आवाहन सातत्याने रेल्वे प्रशासनाकडून केले जात असते. बऱ्याचदा अनेक गाड्या उशिरा येतात, विलंब होतो अशावेळी प्रवाशांनी पर्यायी प्रवासाच्या साधनांचा वापर करावा. शिवाय पावसाचे दिवस असल्याने आणखी काळजी घेणे आवश्यक ठरते.