Anil Gote : धुळ्यातील शासकीय विश्रामगृह इथून एक धक्कादायक आणि गंभीर बातमी समोर येत आहे. धुळ्यातील शासकीय विश्रामगृह येथे पैशाचे घबाड सापडले आहे. बुधवारी या विश्रामगृह येथे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी येथे ठिय्या मांडला होता. पोलिसांनाही फोन करून माहिती दिली, मात्र पोलीस चार ते पाच तासानंतर पोहोचले. मात्र येथे पैशाचे घबाड आढळल्यानंतर अधिकारी यांची पळापळ सुरु झाली आहे तर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या पीएच्या नावाचे पीएनए रूम बुक असल्याचेही समोर येत आहे.
नेमका प्रकार काय आहे?
दरम्यान, शिंदेंच्या सेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखालील अंदाज समिती धुळे दौऱ्यावर आहे. समितीला पैसे वाटण्यासाठी पाच कोटी रुपये अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक राहत असलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या खोलीत ठेवण्यात आले होते, असा आरोप माजी आमदार आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते अनिल गोटे यांनी केला आहे. त्यांनी खोलीबाहेर ठिय्या मांडला होता. त्यांचा एक सहकारी बुधवारी दिवसभर येथे पहारा देत होता. यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.

मात्र पोलीस इकडे चार ते पाच तासानंतर आले आणि जवळपास पाच कोटी रुपयापेक्षा अधिक रक्कम जप्त केली. हे पैशाची मोजमाप अजूनही सुरू असल्याचं अनिल गोटे यांनी सांगितला आहे. मात्र ही पैसाचे घबाड सापडल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, नेमकी ही रक्कम कुणाची आहे? आणि याचा सूत्रधार कोण आहे. याचा तपास सुरु आहे.
आमचा काही संबंध नाही – खोतकर
अंदाज समिती जिल्ह्यातील विविध विकास कामांची पाहणी करून त्याचा दर्जा, गुणवत्ता तपासणार होती. त्यामुळे सध्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर हे धुळे दौऱ्यावर आहेत. आणि ते विविध कामांची पाहणी करत आहेत. अर्जुन खोतकर यांचे पीए यांच्या नावाने 15 मे रोजी 102 नंबर रूम बुक केली होती. आणि त्याच रूममध्ये पैशाचे घबाड सापडले आहे. त्यामुळे हे पैसे आमदार अजून खोतकर यांचेच असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.
मात्र आम्ही धुळे शासकीय विश्रामगृह इकडे फिरकलोच नाही. तिकडे गेलोच नाही. त्यामुळे या पैशाची माझा काही संबंध नसल्याचा खुलासा अर्जुन खोतकर यांनी दिला आहे. मात्र पैशाची घबाड सापडल्यानंतर थेट मंत्रालयापर्यंत फोनाफोनी सुरू असून, हे नेमके पैसे कोणाचे आहेत? याचा शोध सुरू असून पोलीस याबाबत अधिक चौकशी करत आहेत.











