MP Breaking News
Sat, Dec 13, 2025

ब्लेम गेम न करता समन्वयाने काम करा; आशिष शेलारांचे रेल्वे, महापालिका आणि पोलिसांना निर्देश

Written by:Smita Gangurde
या बैठकीला मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, मुंबई पोलीस आयुक्त, पश्चिम आणि मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, मुंबई शहर व उपनगर जिल्हाधिकारी, लोहमार्ग पोलीस आयुक्त, म्हाडाचे मुख्याधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विविध संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुंबई- मान्सूनच्या पहिल्याच पावसानं मुंबईची तुंबई केल्यानंतर आरोप-प्रत्योरापांच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. ठाकरेंची शिवसेना आणि महायुती यांच्यात तुंबई करण्यास जबाबदार कोण, यावरुन आरोप-प्रत्योराप करण्यात येतायेत. मुंबईकरांना पहिल्याच पावसाचा फटका पडल्यानंतर मुंबई उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी नालेसफाईसह कामांचा आढावा घेतलाय.

पावसाळ्यात मुंबईकरांची गैरसोय होणार नाही यासाठी समन्वयाने काम करा, ब्लेम गेम करीत बसू नका, मान्सून पुर्व कामे तातडीने पूर्ण करा, असे निर्देश आशिष शेलार यांनी यंत्रणांना दिले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भांडूप दरम्यान उपनगरीय रेल्वेतून प्रवास करुन प्रत्यक्ष ट्रॅकमध्ये उतरून त्यांनी कामांची पाहणी केली. पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात दोन्ही रेल्वे, महापालिका, मुंबई पोलीस, रेल्वे पोलीस, म्हाडा, एस आर ए आणि संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी दोन्ही रेल्वेच्या हद्दीत करण्यात आलेल्या मान्सून पूर्व कामांचा आढावा घेतला.

शेलारांचा लोकलमधून प्रवास

आशिष शेलार यांनी सीएसएमटी ते भांडूप दरम्यान उपनगरीय लोकलने प्रवास केला. मस्जिद, सँडहर्स रोड ते भायखळा दरम्यान रेल्वे ट्रॅकमध्ये उतरून नालेसफाईची कामांची पाहणी केली. सायन रेल्वे स्टेशनवर बसवण्यात आलेले पंप, कुर्ला, विक्रोळी तसेच भांडूप आणि कांजूरमार्ग रेल्वे स्टेशन परिसरात करण्यात आलेल्या कामांची जागेवर जाऊन पाहणी केली.

मुंबईतील मध्य रेल्वेची काय स्थिती

मध्य रेल्वेवर ८१२ कल्व्हर्ट आहेत त्यापैकी ७५० कल्व्हर्टची साफसफाई झालेली आहे
रेल्वे मार्गावरील हद्दीतील ६३७ धोकादायक झाडांपैकी ५५० झाडांच्या फांद्या तोडण्याची कारवाई
मध्य रेल्वेने गेल्यावेळी ९६ ठिकाणी पंप्स इन्स्टॉल केले होते ते यावेळी वाढवून १७७ पंप्प्स केले आहेत
रेल्वे प्रशासनाने जवळ जवळ ३६ ठिकाणी पुराचे मोजमाप करणाऱ्या यंत्रणा बसवल्या आहेत.

पोलिसांनी डिझास्टर प्लॅन बनवावा

पावसामध्ये रेल्वे स्थानकात स्लो झालेली ट्रेन आणि त्यामुळे प्रवाशांची होणारी दाणादाण आणि वाढणारी गर्दी या स्थितीवर उपाययोजना म्हणून स्थानिक रेल्वे पोलीसांबरोबर मुंबई महानगरपालिकरेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने समन्वय साधावा. अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ३ मिनिटात येणाऱ्या रेल्वेला थोडा उशीर झाला तर प्रवाशांची संख्या वाढते अशा वेळेला कोणताही अन्य प्रसंग घडू नये म्हणून रेल्वे स्टेशनवर अशी परिस्थिती झाल्यास एक डिझास्टर प्लॅन बनवावा ज्यामध्ये बेस्टच्या वाहतूक सेवेची मदत घ्यावी. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या संबंधीत स्थानकांवर अशी उपाययोजना करावी. असेहि निर्देश देण्यात आलेत. कोणत्याही प्रकारचे आरोप-प्रत्यारोप चालणार नाहीत असे मुंबई महानगरपालिका, रेल्वे प्रशासन वेस्टर्न आणि सेन्ट्रल, आपत्ती व्यवस्थापन, रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलीस यांना कडक निर्देश देण्यात आले आहेत.