threatening e-mail to Nair Hospital – शनिवारी गणपती विसर्जनाला नोएडामधून धमकीचा मेसेज आल्यामुळं मुंबई पोलीस सतर्क झाले असताना, सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत धमकीचा ई मेल आला आहे. मुंबईतील प्रसिद्ध नायर रुग्णालयाला बॉम्बनं उडवण्याची धमकी मिळाल्यानं खळबळ उडाली आहे. ही धमकी शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास रुग्णालयाच्या डीनच्या अधिकृत ईमेल आयडीवर मिळाली. या घटनेमुळं रुग्णालय परिसरात काही काळ भीती आणि दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
पोलिसांकडून शोध सुरु
रुग्णालया उडवून देण्याची धमकी आल्यानंतर पोलिसांनी तातडीनं केलेल्या तपासणीत रुग्णालय परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा आक्षेपार्ह वस्तू आढळून आली नाही. सध्या पोलीस या ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी तपास करत आहेत. या ईमेलमुळं रुग्णालय प्रशासनानं तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी बॉम्बशोधक पथक आणि श्वान पथकाच्या मदतीनं रुग्णालय परिसराची कसून तपासणी केली. तपासादरम्यान कोणताही धोका आढळला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा धमकीचा ईमेल अज्ञात व्यक्तीकडून पाठवण्यात आला आहे. त्यामध्ये रुग्णालयाला बॉम्बने उडवण्याचा इशारा देण्यात आला होता.
34 वाहनांमध्ये 400 किलो RDX लावण्याची धमकी
दुसरीकडं ऐन गणेशोत्सवात शनिवारी मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या व्हाट्सअॅप हेल्पलाइनवर एक धमकीपूर्ण संदेश प्राप्त झाला होता. या संदेशात ‘लष्कर-ए-जिहादी’ नावाच्या संघटनेनं 14 पाकिस्तानी दहशतवादी मुंबईत घुसल्याचा आणि 34 वाहनांमध्ये 400 किलो RDX लावून मोठा स्फोट घडवण्याचा दावा केला होता. या धमकीमुळे शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. मुंबई पोलिसांनी तात्काळ कारवाई करत नोएडा पोलिसांच्या मदतीने या प्रकरणातील आरोपी अश्विनी कुमार सुप्रा (वय 50) याला अटक केली. अश्विनी हा मूळचा बिहारमधील पाटना येथील आहे. आरोपी अश्विनी कुमार सुप्राला मुंबईत आणूण त्याची चौकशी केली जाणार आहे.





