…नाहीतर मंत्रालयात ‘नो एन्ट्री’, मंत्रालयात डीजी प्रवेशाचे हजारो कार्ड अभ्यागतांनी केले गायब

ज्या अभ्यागतांनी 3,500 डीजी अॅप प्रवेश कार्ड (RFID) गायब केले आहेत. त्या अभ्यागतांनी डीजी अॅप प्रवेश कार्ड पुन्हा मंत्रालयात जमा करावे, असं आवाहन गृह विभागाने केलं आहे.

Mantralaya Digi Pravesh – मंत्रालयात दररोज हजारो लोकं येतात. लोकांच्या गर्दीमुळं मोठ्या प्रमाणात सुरक्षा यंत्रणेवरती ताण येतो. मंत्रालयातील गर्दी कमी करण्यासाठी आणि लोकांना तासनतास रांगेत उभे राहण्याच्या कटकटीतून सुटका व्हावी यासाठी राज्य शासनाने ‘डीजी प्रवेश अ‍ॅप’ प्रणाली आणली आहे. या अ‍ॅपच्या नोंदणीनंतर तुम्हांला डीजी अॅप प्रवेश कार्ड (RFID) दिले जाते. त्यानंतर मंत्रालयात प्रवेश मिळतो. पुन्हा बाहेर येताना अभ्यागतांनी हे कार्ड परत देणे अनिवार्य आहे, मात्र काही अभ्यागतांनी हे कार्ड गायबच केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळं आता गृह खाते अधिक सतर्क झाले आहे.

3,500 कार्ड गायब?

दरम्यान, अभ्यागतांचे मंत्रालयातील काम झाल्यानंतर त्यांनी परत जाताना डीजी अॅप प्रवेश कार्ड (RFID) मंत्रालयाच्या प्रवेशाजवळ ठेवलेल्या बॉक्समध्ये जमा करणे अनिवार्य आहे. मंत्रालयातील अधिकारी, मंत्र्यांचे सचिव, पीए, कर्मचारी यांच्यासाठी (FRS) फेस रेडींगची सिस्टिम प्रणाली आणली आहे. मात्र अभ्यागतांच्या मंत्रालयातील प्रवेशासाठी डीजी प्रवेश अॅपवर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नोंदणी झाल्यानंतर डीजी अॅप प्रवेश कार्ड (RFID) देण्यात येते. याकरिता राज्य सरकारच्या गृह विभाग खात्याने तब्बल 8 हजार कार्ड तयार केले आहेत. मात्र ८ हजार कार्ड पैकी 3,500 कार्ड अभ्यागतांनी गायब केल्याचा धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

त्यांना मंत्रालयात प्रवेश नाही

दुसरीकडे डीजी अॅपवर नोदणी करुन मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांसाठी साधारण 8 हजार कार्ड बनवले आहेत. यासाठी एक कार्ड तयार करण्यासाठी 100 रुपये गृह विभागाला खर्च आला आहे. मात्र या 8 हजार कार्डापैकी साधारण साडे तीन हजार कार्ड अभ्यागतांनी बॉक्समध्ये जमाच केले नसल्याचे निदर्शनास आले आहे. अशी माहिती गृह विभागाचे उपसचिव चेतन निकम यांनी दिली आहे. ज्या अभ्यागतांनी 3,500 डीजी अॅप प्रवेश कार्ड (RFID) गायब केले आहेत. त्या अभ्यागतांनी डीजी अॅप प्रवेश कार्ड पुन्हा मंत्रालयात जमा करावे, असं आवाहन गृह विभागाने केलं आहे. अन्यथा अशा अभ्यागतांना ब्लक लिस्टमध्ये टाकण्यात येईल. आणि यापुढे मंत्रालयात कायमस्वरुपी त्यांना प्रवेश नाकरण्यात येईल, प्रवेश बंदी असेल, असा इशारा राज्य सरकारच्या गृह विभागाने दिला आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News