MP Breaking News
Sat, Dec 13, 2025

मुंबईकरांच्या तिजोरीवर फक्त महायुतीने डल्ला मारला, शरद पवारांची सत्ताधाऱ्यांवर खोचक टीका

Written by:Astha Sutar
मुंबईतील भुयारी मेट्रो स्थानकं पहिल्याच पावसात महायुतीच्या भोंगळ कारभाराचं पितळ उघडं पाडत आहेत... हजारो कोटी रु. खर्चून मुंबईत अशी कामं झाली असतील तर मुंबईकरांच्या तिजोरीवर फक्त डल्ला मारला गेला आहे हे स्पष्ट आहे !

Sharad Pawar – सोमवारी मुंबईत पावसाने जोरदार बॅटींग केली. गेल्या कित्येक वर्षापासूनचा मे महिन्यातील रेकॉर्ड पावसाने मोडला. मुंबईसह उपनगरात रविवारी रात्रीपासून मुसळधार पावसामुळं मुंबईची तुंबई झाली.  मुंबईतील या पहिल्या पावसामुळं मुंबईत अनेक भागात पाणी साचले. मुंबईत पाणी तुंबल्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असताना, आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांनी सत्ताधारी महायुतीवर शरसंधान साधले आहे.

महायुतीच्या भोंगळ कारभाराचं पितळ उघडं…

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सत्ताधारी महायुतीवर निशाणा साधला आहे. “मुंबईतील भुयारी मेट्रो स्थानकं पहिल्याच पावसात महायुतीच्या भोंगळ कारभाराचं पितळ उघडं पाडत आहेत… हजारो कोटी रुपये खर्चून मुंबईत अशी कामं झाली असतील तर मुंबईकरांच्या तिजोरीवर फक्त डल्ला मारला गेला आहे हे स्पष्ट आहे”, अशी टिका शरद पवारांनी सत्ताधारी यांच्यावर केली आहे.

जनतेच्या पैशाची या काळात फक्त लूट…

दुसरीकडे मुंबईतील पाणी तुंबण्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर प्रहार केला आहे. “एका पावसात मुंबई तर बुडालीच पण मेट्रो भुयारी मार्गात पाणी शिरल्याने भ्रष्टाचार उघडा पडला. तीन वर्ष मुंबई महापालिका भाजपा आणि मिंधे टोळीच्या हातात आहे, जनतेच्या पैशाची या काळात फक्त लूट झाली. त्याचा समाचार आम्ही घेऊच,पण आज माझे शिवसैनिकांना आवाहन आहे, ते म्हणजे रस्त्यावर उतरा आणि लोकांना मदतीचा हात द्या” असं उद्धव ठाकरेंनी म्हणत महायुतीवर टीकास्त्र डागले आहे

महायुतीच्या बेशिस्त कारभारामुळे मुंबई पाण्यात – काँग्रेस

शरद पवार आणि  ठाकरे गटाच्या टिकेनंतर काँग्रेसनंही महायुतीवर हल्लाबोल चढवला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून सुद्धा सरकार मुंबई स्वच्छ करू शकत नाही, नाले सफाईचे पाण्याचे नियोजन, चांगले रस्ते करू शकत नाही. महायुतीच्या बेशिस्त कारभारामुळे मुंबई पाण्यात गेली आहे. महायुती सरकार हे भ्रष्टाचारी असून, फक्त एका पाण्यातच मुंबई बुडते. ही या सरकारची उदासीनता आहे, अशी टिका काँग्रेस आमदार नाना पटोलेंनी महायुतीवर केली आहे.