आनंदाची बातमी! अंगणवाडी सेविका, मदतनीसांना राज्य सरकारचा दिलासा, दिवाळीत मिळणार 2 हजार रूपये ‘भाऊबीज भेट’

Astha Sutar

Anganwadi workers : उन्हाळा असो वा पावसाळा आपले कर्तव्य चोख बजावणाऱ्या राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची दिवाळी गोड होणार आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दोन हजार रुपये ‘भाऊबीज’ भेट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील ९२ हजार अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना राज्य सरकारचा दिलासा मिळाला आहे. यासाठी राज्य सरकारने ४०.६१ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे.

४०.६१ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी

दरम्यान, राज्यातील अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या या मानधनी कर्मचाऱ्यांना सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी प्रत्येकी दोन हजार रूपये ‘भाऊबीज भेट’ रक्कम देण्यास शासनाने गुरूवारी मंजुरी दिली. त्यामुळे राज्यातील सुमारे ९२ हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे. महिला व बाल विकास विभागाने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे राज्यभरातील हजारो अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दिलासा मिळाला आहे. याकरिता सरकारने ४०.६१ कोटींच्या निधीस मंजुरी दिली आहे.

अंगणवाडी सेविकांमध्ये आनंदाचे वातावरण

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ही भाऊबीज भेट रक्कम त्वरित अदा करण्यासाठी राज्य शासनाने ४० कोटी ६१ लाख ३० हजार इतका निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीचे वितरण ‘आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई’ यांच्या नियंत्रणाखाली करण्यात येणार आहे. शासनाने आयुक्तांना तातडीने या रकमेचे वितरण करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन मर्यादित असल्याने दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. शासनाने जाहीर केलेली ही भेट त्यांच्यासाठी मोठा आधार ठरणार असून, कुटुंबासह दिवाळी आनंदाने साजरी करण्यास मदत होणार आहे.

ताज्या बातम्या