चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या संजय राऊतांवर कारवाई करा, शिवसेनेच्या शिष्टमंडळाची मुंबई पोलीस आयुक्तांकडे मागणी

नेपाळमध्ये झाली तशीच हिंसा भारतात होऊ शकते असे म्हणून देशात हिंसाचार घडवण्याच्या धमक्या देणाऱ्यांवर कारवाई व्हायलाच हवी, अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत शिवसेनेनं पोलीस आयुक्त देवेन भारती यांना निवेदन दिले आहे.

Shivsena : चिथावणीखोर वक्तव्य करून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी आज शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे केली. याबाबत शिवसेनेच्या वतीने निवेदन मुंबई पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहे. “नेपाळसारखी भारत देशात देखील परिस्थिती उद्भवू शकते. सावधान राहा… ” अशी पोस्ट उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊतांनी केली आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्र्यांना टॅग केलं आहे. यानंतर आता संजय राऊतांविरोधात शिवसेना (शिंदे) आक्रमक झाली आहे.

यावेळी शिवसेना खासदार मिलिंद देवरा, शिवसेना सचिव संजय मोरे, आमदार तुकाराम काते, शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे, प्रा. ज्योती वाघमारे, संजना घाडी, माजी नगरसेविका सुशिबेन शहा, तृष्णा विश्वासराव, सुवर्णा करंजे, आशा मामेडी हे उपस्थित होते.

राऊतांकडून अराजकता माजवण्याचा प्रयत्न…

दरम्यान, लोकशाही मार्गाने आपण विजय मिळवू शकत नाही. संजय राऊत यांनी यापूर्वी लोकशाहीतील चारही स्तंभांवर अविश्वास व्यक्त करून अराजकता माजवण्याचे त्यांचे प्रयत्न यापूर्वीही उघड झाले आहेत. नेपाळमध्ये झालेल्या हिंसाचाराची चित्रफित प्रसारित करून देशातही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. तसेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्र्यांना टॅग केलं आहे. यातून ते पंतप्रधानांना धमकी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रक्षोभक वक्तव्य करून संजय राऊत यांनी अराजक निर्माण करण्याचे मनसुबे जाहीर केले आहेत. हिंसाचार घडवण्याच्या धमक्या देणाऱ्यांवर कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

ये डर अच्छा है!

दुसरीकडे संजय राऊत यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी एक पोस्ट करत शिवसेनेच्या या शिष्टमंडळाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. “महाराष्ट्रात आणि देशात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, नेपाळी तरुणांचा लढा भ्रष्टाचार आणि हुकूमशाही विरुद्ध असल्याचे मी सांगताच महाराष्ट्रात मिंधे गटाने माझ्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली, आज हेच मूर्ख लोक पोलिस आयुक्ताना भेटून माझ्यावर कारवाईची मागणी करत आहेत; खुशाल करा अशी मागणी! हे लोक घाबरले आहेत.

भ्रष्टाचार करून पैसा आणि सत्ता मिळवली तरी कधीतरी नेपाळ होणारच; ये डर अच्छा है! नेपाळच्या तरुणांनी क्रांतीचा मार्ग दाखवला, भ्रष्ट शासन कर्त्याना रस्त्यावर आणले. त्यामुळे एकजात सगळे मिंधे लोक घाबरणारच!” असं पोस्टमधून राऊतांनी शिंदेंच्या शिष्टमंडळाला प्रतिउत्तर दिलं आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News