आगामी मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचे आता जवळपास निश्चित झालं आहे. कारण, गेल्या 4 महिन्यात ठाकरे बंधू आणि ठाकरे कुटुंब वारंवार एकत्र येताना दिसून येत आहे. त्यातच आज पुन्हा एकदा राज आणि उद्धव ठाकरे भाऊबीज सणानिमित्ताने बहिणीच्या घरी येत आहेत. उद्धव आणि राज ठाकरे त्यांच्या चुलत बहीण जयजयवंती यांच्या घरी भाऊबीजेसाठी आले आहेत.
ठाकरे कुटुंबातील कौटुंबिक स्नेह गेल्या काही महिन्यांपासून अधिक दृढ होताना दिसत आहे. भाऊबीजेच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांची बहीण जयजयवंती ठाकरे-देशपांडे यांच्या शिवाजी पार्क येथील निवासस्थानी भेट दिली. या प्रसंगी राज ठाकरे देखील आपल्या कुटुंबीयांसह उपस्थित होते. तब्बल २० वर्षांच्या राजकीय मतभेदांनंतर ठाकरे बंधू एकाच ठिकाणी एकत्र आल्याचे हे चित्र कौटुंबिक आणि राजकीय अशा दोन्ही स्तरांवर महत्त्वाचे मानले जात आहे.
ठाकरेंचे नातेसंबंध पुन्हा दृढ
या दिवाळीत ठाकरे कुटुंबाने गणेश चतुर्थी, राज ठाकरे यांच्या मातोश्री मधुवंती ठाकरे यांचा वाढदिवस आणि आता भाऊबीज असे अनेक सण एकत्र साजरे केले आहेत. मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटनही प्रथमच उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. या भेटीगाठींमुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संभाव्य राजकीय युतीबाबतच्या चर्चांना जोर आला असून, कार्यकर्ते आणि राजकीय विश्लेषक याकडे लक्ष ठेवून आहेत. सद्यस्थितीत कौटुंबिक नातेसंबंध मजबूत करण्यावर भर दिला जात असल्याचे दिसून येत आहे.
ठाकरेंची नेक्स्ट जनरेशन एकत्र
आदित्य आणि तेजस ठाकरे हेही ठाकरे कुटुंबातील भाऊबीज स्नेह भोजन कार्यक्रमानिमित्त एकत्र आले आहेत. त्यामुळे, गेल्या 4 महिन्यातील ही ठाकरे बंधूची आजची 10 वी भेट आहे. काही दिवसांपूर्वी दीपावली दीपोत्सव निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, यांसह ठाकरे कुटुंब एकत्र आले होते. त्यावेळी, दोन्ही कुटुंबातील स्नेहबंध महाराष्ट्राने पाहिले. त्यामुळेच, आता ठाकरे बंधुच्या युतीची औपचारिक घोषणा कधी होणार याची उत्सुकता राज्यााला आहे, आता ही घोषणा कधी होणार हेच पाहावे लागेल?





