Nitesh Rane : मत्स्य व्यवसायाबाबत एक महत्वाची व मोठी बातमी समोर येत आहे. मच्छीमारांच्या सर्व योजना जिल्हा बँकांमार्फत राबवून मुंबई बँकेला यासाठी नोडल एजन्सी नेमण्यात येणार आहे. यासंदर्भात आज मंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीती मुंबई बँक आणि मच्छीमार सहकारी संस्था यांची एकत्रित बैठक मुंबई बँकेच्या मुख्य कार्यालयात पार पडली. महायुती सरकारने मत्स्यव्यवसायाला नुकताच कृषी समकक्ष दर्जा दिला आहे. यासाठी मत्स्यव्यवसायिकांना प्रत्यक्षात सवलती मिळण्यासाठी मार्गदर्शक सूचना तातडीने निर्गमित करण्यात येणार आहेत, असं राणे यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीस मुंबई बँकेचे अध्यक्ष विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर, उपाध्यक्ष सिद्धार्थ टी.कांबळे बँकेचे सर्व संचालक, मत्स्यव्यवसाय आयुक्त, मंत्रालयातील मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी, मच्छीमार सहकारी संस्था आणि संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

स्वतंत्र योजनांचा फायदा मच्छीमारांना होईल…
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही मत्स्यव्यवसायला कृषीचा दर्जा दिलेला आहे. प्रविण दरेकर आणि संघटनांचे प्रतिनिधी यांनी ज्या मागण्या केल्या आहेत, त्यावर तातडीने आम्ही कार्यवाही करू. मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा मिळाल्याने सर्व योजना आणि सवलतींचा फायदा आता कायदेशीररित्या मच्छीमारांना मिळेल. मत्स्यव्यवसाय विभागाच्या स्वतःच्या अशा स्वतंत्र कोणत्याही योजना नाहीत. त्यामुळे येणाऱ्या काही महिन्यात विभागाच्या माध्यमातून स्वतंत्र योजना आम्ही सुरू करणार आहोत आणि त्याचा फायदा मच्छीमारांना होईल. असा विश्वास मंत्री नितेश राणेंनी व्यक्त केला.
मत्स्यव्यवसाय पतपुरवठा आराखडा तयार करावा
दुसरीकडे मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याबाबतच्या शासन निर्णया प्रमाणे मार्गदर्शक सूचना तातडीने काढाव्यात. इतर शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी जी कार्यपध्दती निश्चित केलेली आहे, त्या धर्तीवर कार्यपद्धती तयार करावी. इतर शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या वाटपात जिल्हा बँकांचा मोठा सहभाग आहे. तशाच प्रकारचा सहभाग असावा, मच्छिमारांना द्यायच्या पीककर्जासाठी जिल्हा बँकांचा असला पाहिजे. तसेच मत्स्यव्यवसाय पतपुरवठा आराखडा तयार करावा. असं मच्छीमार संघटनांनी मागण्या केल्या आहेत.
दरम्यान, सागरी किनाऱ्यावरील अनधिकृत आणि देशविघातक शक्तींना शोधून त्यांना हटविण्याचे काम आमच्या विभागाने केले आहे. त्याचा फायदा नक्कीच आपल्या मच्छीमारांना मिळणार असल्याची ग्वाही यावेळी मंत्री नितेश राणे यांनी दिली.











