हॉटेल भाग्यश्री आणि हॉटेल तिरंगा या दोन्ही धाराशिव जिल्ह्यातील हॉटेल्समुळे महाराष्ट्राला ढवारा मटण आणि रश्श्याची नव्याने ओळख झाली. सर्वत्र हे मटण चर्चेत आलं. गावोगावच्या हॉटेलमध्ये ढवारा मटण थाळी सुरू झाली. मटण प्रेमींमध्ये चांगलीच क्रेझ वाढली. पण या मटणाच्या संदर्भात काही मुळ प्रश्न तुम्हाला नक्कीच पडले असतील, जसे की ढवारा मटण ही डिश नेमकी कोणत्या प्रदेशातली? ढवारा मटण कसं बनतं, या आणि अशा अनेक बाबी आहेत. ढवारा मटणाच्या संदर्भात कुणालाच माहिती नसणाऱ्या काही बाबी जाणून घेऊ…
ढवारा मटणाची उत्पत्ती आणि इतिहास काय?
खरंतर ढवारा हा शब्द एका धार्मिक कार्यक्रमाशी संबंधित आहे, जिथे स्थानिक देवी-देवतांना प्रसन्न करण्यासाठी अख्खा बोकड कापून त्याचा नैवेद्य दाखवला जातो. ही एक खास आणि पारंपरिक पद्धत आहे, शेकडो वर्षांपासून ही परंपरा सुरू असल्याचे सांगितले जाते. ज्यात मटण शिजवण्याआधी उकळले जात नाही. त्याऐवजी, जिवंत बोकड कापून त्याचे थेट मटण बनवले जाते आणि ते शिजवले जाते. ढवारा मटणाची उत्पत्ती मराठवाड्यात झाली आहे आणि ती देवी-देवतांना नैवेद्य म्हणून अर्पण करण्याची एक पारंपरिक पद्धत आहे. या पद्धतीमध्ये मटण उकळण्याऐवजी, अख्खा बोकड कापून थेट त्याची भाजी बनवली जाते. हा शब्द विशेषतः बीड जिल्ह्याशी संबंधित आहे.
आजकाल अनेक हॉटेल्समध्ये ही पारंपरिक पद्धत अवलंबली जाते आणि त्याला ‘ढवारा मटण थाळी’ म्हणून ओळखले जाते. या पारंपरिक पद्धतीमुळे प्रेरित होऊन ‘ढवारा मटण मसाला’ सारखे घरगुती मसाले देखील बाजारात उपलब्ध झाले आहेत, जे या पदार्थाची चव वाढवतात. दिवसेंदिव या मटणामध्ये ‘व्हॅल्यू अॅडीशन’ सुरूच आहे.
ढवारा मटणाची नेमकी रेसिपी जाणून घ्या !
सहसा आपण मटण आणून त्याला शिजवतो आणि त्यानंतर भाजी बनवतो. मात्र ढवारा मटण थेट तुकडे करुन त्याची भाजी बनवतात, ज्यामुळे त्याची चव बदलते. यात अख्खा बोकड कापून त्याची भाजी बनवतात आणि ती मोठ्या भांड्यात किंवा हंड्यात शिजवतात, ज्यामध्ये मसाले आणि इतर साहित्य वापरले जाते. त्याला कंदुरी मटण असेही म्हणतात. मराठवाड्यांमध्ये यात्रा- जत्रांमध्ये ढवारा मटण केले जाते. एकाचवेळी संपूर्ण बोकड कापून त्याचे मोठे मोठे तुकडे करुन शिजवले जातात आणि ते गावात वाटले जाते. झणझणीत मसाला आणि मोठे पीस करुन शिजवण्याच्या पद्धतीने ढवारा मटण वेगळे ठरते.
तसेच मराठवाड्यामध्ये शेतात ज्वारीची मळणी करत असताना ज्वारीची रास खळ्यामध्ये पडायची. त्याच्या रक्षणासाठी शेतात मुक्काम करावा लागायचा. त्यासाठी जी मंडळी शेतावर मुक्कामाला असे, त्यांच्यासाठी आणि इतर मित्र , नातेवाईक यांना रात्रीच्या वेळी खास जेवण बनवले जाई त्यालाही ढवारा असे म्हणतात. सातारा जिल्ह्यामध्ये त्यालाच पाल जत्रा असेही म्हणतात.





