ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर अनंतात विलीन; पुण्यात दिग्गजांनी वाहिली श्रध्दांजली

Rohit Shinde

मराठी आणि हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे काल शनिवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांनी वयाच्या 69 वर्षी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आज त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार झाले. त्यावेळी त्यांची मुलगी म्हणजेच अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने अंत्यसंस्कार केले आहेत. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली.

अभिनेत्री तेजस्विनी पंडितला मातृशोक अनावर

दरम्यान आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी अतिशय भावूक झाली तिचे अश्रु अनावर झाले, त्यानंतर तेजस्वीनीने एक भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ज्योती चांदेकरांच्या अचानक जाण्याने संपूर्ण मराठी कलाविश्वात शोककळा पसरली आहे. ज्योती चांदेकरांच्या कामाविषयी सांगण्याचे झाले तर, 1969 मध्ये ज्योती एका हिंदी चित्रपटाचं शूटिंग पाहायला गेल्या होत्या. त्यावेळी दिग्दर्शकाने लहान मुलींची गरज असल्याचं सांगून काही मुलींना बोलावलं. त्यावेळी ज्योती यांनी काही हिंदी संवाद वाचून दाखवले आणि दिग्दर्शकांच्या पसंतीस उतरल्या. त्यातूनच त्यांची पहिली हिंदी चित्रपटात भूमिका मिळाली. त्यानंतर त्यांना ‘सुंदर मी होणार’ या नाटकात काम करण्याची संधी मिळाली आणि त्या नंतर त्यांनी अनेक गाजलेली नाटकं केली.

ठरलं तर मग मालिकेच्या पूर्णा आजीचं निधन…

ज्योती चांदेकर यांनी सिंधुताई सपकाळ या चित्रपटात सिंधुताईंची भूमिका साकारली होती. तर त्यांची लेक तेजस्विनी पंडित हिने सिंधुताई सपकाळंची तरुणपणातील भूमिका साकारली होती. त्याशिवाय ठरलं तर मग स्टार प्रवाहवरील प्रसिद्ध मालिकेत त्यांनी पूर्णा आजीची भूमिका साकारली होती. पूर्णा आजीबद्दल चाहत्यांना आदर वाटत होता. मात्र अचानक पूर्णा आजीच्या निधनाने चाहत्यांनाही धक्का बसला आहे.

ज्योती चांदेकर या सोशल मीडियावर बऱ्याच सक्रिय होत्या. ठरलं तर मग मालिकेच्या सेटवर अनेकांसोबत ते रिल्स करायच्या. फोटो सेशन करायच्या आणि सोशल मीडियावर नियमित शेअर करीत होत्या. अगदी मेकअफ क्रूपासून मालिकेतील सर्व पात्रांसोबत त्यांची छान गट्टी जमली होती. सर्वांना त्यांच्याविषयी अपार आदर होता. आपल्याला वडिलाधाऱ्या अभिनेत्रीने अचानक घेतलेल्या एग्झिटमुळे कलाकारांना धक्का बसला आहे.

ताज्या बातम्या