देशभरातील हवामान सातत्याने बदलताना दिसत आहे. महाराष्ट्रात देखील सततच्या हवामानातील बदलांमुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीतमध्ये रात्रीच्या वेळी कडाक्याची थंडी तर दिवसा कडक ऊन असे वातावरण सध्या अनुभवास येत आहे. दक्षिणेतील काही राज्यांमध्ये पावसाचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्याचा परिणाम थेट महाराष्ट्रामध्ये जाणवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे एकूणच हवामान कसे राहिलं, ते जाणून घेऊ…
हवामान बदलामुळे नागरिक हैराण!
महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. नोव्हेंबर अखेर पुन्हा हवापालट झाली असून काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील तापमानात वाढ झाली. मात्र थंडीचा अनुभव कायम आहे. आज 23 नोव्हेंबर रोजी संमिश्र अशा स्वरूपाचे हवामान राज्यभरात अनुभवायला मिळत आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये दिवसभर आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. तसेच काही प्रमाणात गारठा जाणवेल, छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान सुमारे 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतके राहू शकते.
बीड, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात आज वातावरण कोरडे राहणार आहे. तसेच आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज असून, सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी थंडीची तीव्रता जास्त जाणवेल. दिवसभर मात्र गारठा कमी राहणार असून तापमानाचा पारा 32 अंशांवर जाईल. तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतके राहू शकते. तिकडे विदर्भातील नागपूर, वर्धा जिल्ह्यांतही अशाच स्वरूपाचे हवामान राहणार आहे.
पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मुंबईसह कोकणातील सर्वच जिल्ह्यांत गारठा काहीसा कमी झाला आहे. वातावरणामध्ये लक्षणीय अशा स्वरूपाचे बदल पाहायला मिळत आहेत. दिवसा कडक गारठ्याची अनुभूती येत आहे. शिवाय बंगाालच्या उपसागारातील बदलांमुळे दक्षिण भारतासह महाराष्ट्रातील काही भागांत तुरळक अशा स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे.
पण, थंडीचा जोर पुन्हा वाढणार !
आठ दिवसांसाठी थंडीचा जोर कमी होणार असून, नागरिकांना गारठ्यापासून थोडा दिलासा मिळणार आहे. हवामान शास्त्रज्ञांच्या मते, सध्या बंगालच्या उपसागरात जे वादळ तयार होत आहे, त्याचा थेट परिणाम स्थानिक हवामानावर दिसून येत आहे. या बदलामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा वेग मंदावला आहे, तर त्याऐवजी बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या उष्ण हवेचा प्रवाह वाढला आहे. याचसोबत हवेतील आर्द्रतेतही वाढ झाली आहे. त्यामुळे, आता नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता असून, थंडीचा कडाका कमी राहील.
थंडीचा जोर लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी कमाल तापमानात २.२ अंश सेल्सियसने वाढ तर किमान तापमानात १.७ अंश सेल्सियसने घट झाली आहे. सध्याची ही स्थिती तात्पुरती आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळेल, परंतु डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून थंडीचा जोर पुन्हा वाढेल. वादळी हवामान स्थिर झाल्यानंतर उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह पुन्हा सुरू होतील आणि तेव्हा खऱ्या अर्थाने कडाक्याची थंडी अनुभवायला मिळेल.





