मुंबई– मनोज जरांगे यांच्यासह हजारो मराठा आंदोलक मुंबईत ठिय्या मांडून बसले आहेत. मराठ्यांना कुणब्यांतून सरसकट आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील आग्रही आहेत. आता आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. मविआ आणि महायुतीतील काही आमदार, खासदारांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. अशात जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे कोण, याची चर्चा सुरु आहे.
तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर खापर फोडलंय. जरांगे पुन्हा आंदोलनाला का आले? हे एकनाथ शिंदेंना विचारा असा टोला राज ठाकरेंनी लगावलाय. मागच्या वेळी नवी मुंबईत आरक्षणाचा प्रश्न मिटवला, असं जरांगे यांची भेट घेत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं होतं. तर आता जरांगे पुन्हा का आले, याचं उत्तर शिंदेंनी द्यावं असं सांगत राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.

सरकारमध्ये तीन गट, राऊतांचीही टीका
जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरु राऊत यांनीही सरकारला लक्ष्य केलं आहे. महायुती सरकारमध्ये तीन गट आहेत. शिंदेंची शिवसेना अप्रत्यक्षपणे जरांगे पाटील यांना मदत करत असल्याचा आपोही राऊत यांनी केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी जरांगेंना बळ पुरवलं जात असल्याचंही राऊत यांचं म्हणणं आहे.
एकनाथ शिंदे आणि अमित शाहा यांची चर्चा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेतत. या दौऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाहा यांची भेट घेऊन त्यांच्याशी सुमारे तासभर चर्चा केली. या चर्चेत मराठा आरक्षणावर चर्चा झाल्याची माहिती आहे.
भाजपाकडून शिंदेंची पाठराखण
माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणबाबत कोणतेही खोटे आश्वासन दिले नाही. जे लिहून दिलं होतं त्याच्या आधारे मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यात असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. तसेच मराठा आरक्षणाच्या विषयावर आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर जे जे तोडगे काढता आले ते काढण्यात आले. पण नाइलाजला कोणताच इलाज नसतो. असंही चंद्रकांत पाटील पुढे म्हणालेत.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना 2024 मध्ये 26 जानेवारीला जरांगे पाटील आंदोलनासाठी मुंबईच्या वेशीवर धडकले होते. त्यानंतर सरकारच्या शिष्टमंडळानं जरांगे पाटलांनी सुचवलेल्या सुधारणा करून आरक्षणाबाबत अधिसूचना जारी केली
वाशीतील सभास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुधारित अध्यादेश जरांगे पाटलांना सुपूर्द करत भाळी विजयाचा गुलालही लावला
त्याच दिवशी राज ठाकरेंनी जरांगेंच्या आंदोलनाबाबत ट्विट करत आरक्षण कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा असा सवाल केला होता
27 जानेवारी 2024चं राज ठाकरेंचं ट्विट
मनोज जरांगे पाटील यांचं अभिनंदन. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या ! आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा, म्हणजे आपल्या मराठा बांधवांना, भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल ! लोकसभा निवडणूकी आधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा !
आरक्षणाबबात राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका
आरक्षणाचा प्रश्न न सुटल्यानं राज ठाकरे वेळोवेळी आपल्या भाषणातून रोखठोकपणे भूमिका मांडताय
2023 मध्ये अंतरावाली सराटीत आरक्षणासाठी मनोज जरांगेंसह मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता . त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनोज जरांगेंच्या भेटीसाठी अंतरावालीत पोहोचले होते
मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळणार नाही, अशी भूमिका राज ठाकरेंनी जरांगेंसमोरच मांडली होती. त्यानंतर पुढे वर्षभर मराठा-ओबीसी वाद पेटला असताना आरक्षणाची गरजच नाही असं परखड मत व्यक्त केल्यानं वाद झाल्याचं बघायला मिळालं.
सध्या राज ठाकरे वगळता कुणताही नेता आरक्षणवर स्पष्टपणे भूमिका घेताना दिसत नाही. प्रत्येकाला आपली मतपेढी महत्त्वाची असल्यानं आरक्षणाचा मुद्दा पेटवत ठेवला जातोय .











