MP Breaking News
Sat, Dec 13, 2025

राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना जाहिरातीवर कोट्यावधीची उधळण कशासाठी? आमदार रोहित पवारांचा सवाल

Written by:Astha Sutar
या जाहिराती देवेंद्र फडणवीस साहेबांना न कळवताच सरकारमधील एका मंत्र्याने परस्पर दिल्या असल्याचे समजले आणि विशेष म्हणजे हे मंत्री महोदय भाजपाचे नाहीत तर मित्रपक्षाचे आहेत असे देखील कळत आहे.

Rohit Pawar – आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्तमानपत्रातील जाहिरातीवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टिका केली आहे. तर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. “एकीकडे राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या होत असताना आणि अतिवृष्टीने संपूर्ण महाराष्ट्र झोडपला असताना वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर तसेच अनेक विमानतळांवर कोट्यवधी रुपये उधळून मुख्यमंत्र्यांच्या मोठमोठ्या जाहिराती देण्याची सरकारची वृत्ती बघून मोठी चीड आली. परंतु मा. देवेंद्र फडणवीस साहेबांसारखे मोठे नेते अशी चूक करणार नाहीत, हा विश्वास होता”.

जाहिरातीसाठीचे कोट्यवधी रुपये कुठून आले?

“या कोट्यावधी रुपयांच्या जाहिरातीबद्दल अधिक माहिती घेतली असता या जाहिराती देवेंद्र फडणवीस साहेबांना न कळवताच सरकारमधील एका मंत्र्याने परस्पर दिल्या असल्याचे समजले आणि विशेष म्हणजे हे मंत्री महोदय भाजपाचे नाहीत तर मित्रपक्षाचे आहेत असे देखील कळत आहे. मला मिळालेली माहिती खरी असेल तर मित्रपक्षाच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसाठी निनावी पद्धतीने परस्पर एवढ्या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती का दिल्या? या जाहिरातीसाठीचे कोट्यवधी रुपये कुठून आले? हा मंत्री कोण? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. जाहिराती देणारे समोर आले तर या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील.” असं पोस्टमध्ये रोहित पवारांनी म्हटलेय.

जाहिरातीचा पैसा ठेकेदारांचा, बिल्डरांचा की अंडरवर्ल्डचा?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘देवा भाऊ’ असा उल्लेख करीत प्रमुख वृत्तपत्रांमध्ये झळकलेली निनावी जाहिरात सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणारी ही जाहिरात कोणी दिली? त्यासाठी लागणारा 40-50 कोटींचा खर्च कुठून आला?, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणारी ही जाहिरात कोणी दिली?

“छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणं प्रत्येक मराठी माणसाचं कर्तव्य आहे. पण या जाहिरातीचा खर्च कोणी केला? हा पैसा ठेकेदारांचा, बिल्डरांचा की अंडरवर्ल्डचा आहे? भाजपानेच ही जाहिरात दिलीय, याची मला खात्री आहे, असं राऊतांनी टिका केलीय.